Monday, November 9, 2026
HomeनगरAhilyanagar : दुष्काळामुळे जिल्ह्यात गहू पेरणीला ब्रेक

Ahilyanagar : दुष्काळामुळे जिल्ह्यात गहू पेरणीला ब्रेक

पाण्याअभावी रब्बी हंगामाची पेरणी संथ || ज्वारी, हरभर्‍यालाही अल्प प्रतिसाद

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

यंदा पावसातील खंड आणि दुष्काळी परिस्थितीचा परिणाम रब्बी हंगामाच्या पेरणीवरही दिसू लागला आहे. जिल्ह्यात रब्बी पिकांच्या पेरणीला अपेक्षित वेग मिळत नसून, 7 नोव्हेंबर अखेर अवघ्या 60 हजार 979 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ज्वारी आणि हरभरा ही जिल्ह्यातील प्रमुख रब्बी पिके असतानाही त्यांच्या पेरणीची स्थिती समाधानकारक नाही. गव्हाच्या पेरणीने तर सरासरीच्या तुलनेत केवळ दोन टक्क्यापर्यंत मजल मारली आहे. यामुळे यंदा सर्वसामान्यांच्या ताटातून गव्हाची पोळी गायब होणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्याच्या पिकनिहाय पेरणी अहवालानुसार, ज्वारीच्या सरासरी 1 लाख 62 हजार 909 हेक्टर क्षेत्रापैकी 33 हजार 541 हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभर्‍याचे सरासरी क्षेत्र 1 लाख 8 हजार 346 हेक्टर असताना प्रत्यक्ष पेरणी केवळ 7 हजार 8 हेक्टरवर झाली आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र 1 लाख 28 हजार 462 हेक्टर असून, प्रत्यक्षात अवघ्या 2 हजार 716 हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याची पेरणी 8 हजार 473 हेक्टरवर झाली असून, सरासरी क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण 17.55 टक्के आहे. इतर तृणधान्यांची पेरणी 282 हेक्टरवर झाली आहे. एकूण तृणधान्यांची पेरणी 44 हजार 223 हेक्टरवर झाली आहे.

कडधान्य पिकांमध्ये हरभर्‍याची स्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यात कडधान्यांचे सरासरी क्षेत्र 1 लाख 9 हजार 200 हेक्टर असून, प्रत्यक्ष पेरणी 7 हजार 278 हेक्टरवर झाली आहे. दुसरीकडे, गळीतधान्यांची पेरणीही अत्यल्प आहे. करडई 10 हेक्टर, जवस 6.5 हेक्टर, सूर्यफूल अवघ्या 0.6 हेक्टरवर असून, तिळाची पेरणी झालेली नाही.

ऊसाच्या नवीन लागवडीचे सरासरी क्षेत्र 94 हजार 693 हेक्टर असताना प्रत्यक्षात केवळ 863 हेक्टरवर लागवड झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीचा वेग अद्यापही मंदावलेलाच असल्याचे चित्र आहे. पाणीटंचाई, जमिनीतील ओलाव्याचा अभाव आणि पावसातील खंड यामुळे रब्बी पेरणीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. आगामी काळात पावसाची स्थिती आणि उपलब्ध ओलाव्यानुसार पेरणीच्या क्षेत्रात वाढ होते का, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

अवघी 14 टक्केच पेरणी
नगर जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र 4 लाख 49 हजार 667 हेक्टर असून यातील 61 हजार हेक्टरवर पिकांच्या पेरण्या झालेल्या आहेत. पेरण्याची टक्केवारी ही 13.66 टक्केे आहे. अनेक ठिकाणी ज्वारी पिक उगवून आलेले असून पिकाच्या वाढीसाठी आवश्यक ओल आणि थंडी नसल्याने ज्वारी पिकाचे बाटूक होणार आहे.

ताज्या बातम्या

AMC : महापालिकेच्या घंटागाडी नियोजनाचा बोजवारा!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar प्रत्येक घरापर्यंत घंटागाडी पोहोचते की नाही, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कचरा संकलनाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी महापालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत घराघरांवर क्यूआर कोड...