अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीच्या नुकसानभरपाईची रक्कम मंजूर करून देण्यासाठी एक लाख 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि एका कंत्राटी कर्मचार्याविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
यामध्ये महसूल सहाय्यक मंगेश विजय ढुमणे (सध्या नेमणूक जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर) आणि कंत्राटी कर्मचारी अमोल कानिफनाथ खामकर (उपविभागीय अधिकारी कार्यालय, श्रीगोंदा-पारनेर विभाग) यांचा समावेश आहे.
तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची मौजे जंगलेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील 143 गुंठे जमीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548-डीवरील रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पासाठी शासनाने संपादित केली होती. या भूसंपादनाच्या बदल्यात तक्रारदारांना अतिम व पुरवणी अवॉर्डनुसार सुमारे 1 कोटी 47 लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली होती. मात्र, या रकमेतील प्रलंबित निधी मिळण्यासाठी आवश्यक असलेली एफ.टी.ओ. (फंड ट्रान्स्फर ऑर्डर) मंजूर करून देण्याच्या प्रक्रियेत संशयित आरोपींनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयितांनी वेळोवेळी पैशांची मागणी केली होती. तसेच 4 मे 2026 रोजी महसूल सहाय्यक मंगेश ढुमणे याने व्हॉट्सअॅप कॉलव्दारे तक्रारदारांशी संपर्क साधून एक लाख 20 हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिल्यास एफ.टी.ओ. तात्काळ मिळेल आणि मंजुरीसाठी वरिष्ठ अधिकार्यांनाही पैसे द्यावे लागतील, असे संशयिताने सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 6 मे रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली. या पडताळणीत मंगेश ढुमणे आणि अमोल खामकर यांनी तक्रारदारांची नुकसानभरपाईची रक्कम मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेली एफ.टी.ओ. मंजुरी मिळवून देण्याच्या मोबदल्यात 1 लाख 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती एसीबीने दिली.




