अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक अर्चना कुटे (रा. हिरालाल पेठ, बीड) व आशा पाटोदेकर (रा. सोलापूर) या दोघींना नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांंनी ताब्यात घेतले आहे. त्यांना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. दरम्यान, त्यांना श्रीरामपूर येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
श्रीरामपूर येथील ठेवीदारांचे पैसे ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये अडकले असून या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 29 जुलै 2024 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच जामखेड मधील ठेवीदारांचेही पैसे अडकले असून 19 जणांविरूध्द जामखेड पोलीस ठाण्यात 7 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. हे दोन्ही गुन्हे तपासकामी येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहेत. दोन्ही गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. यापूर्वी चेअरमन सुरेश कुटेसह चौघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना अटक केली होती. दरम्यान, संचालक अर्चना कुटे व आशा पाटोदेकर या दोघांना बीड पोलिसांनी अटक केली होती. त्या दोघी बीड पोलिसांच्या ताब्यात होत्या.
न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या दोघींना बीड पोलिसांच्या ताब्यातून घेतले आहे. त्यांना सध्या श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट मध्ये बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर येथील ठेवीदारांच्या सुमारे चार हजार कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. या मल्टिस्टेटचा चेअरमन सुरेश कुटे याच्यासह संचालक मंडळाविरूध्द बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड व श्रीरामपूर येथील ठेवीदारांच्या ठेवी दिल्या नसल्याने त्यांच्याविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात चेअरमन कुटेसह 15 जणांविरूध्द तर जामखेड पोलीस ठाण्यात चेअरमन कुटेसह 19 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




