Friday, May 3, 2024
Homeनाशिकशाळांमध्ये ‘नागरिकत्व’सारखे विषय नको; शासनाचे शाळांना आदेश

शाळांमध्ये ‘नागरिकत्व’सारखे विषय नको; शासनाचे शाळांना आदेश

नाशिक । प्रतिनिधी

राजकीय उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सरकारी आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागी करणे शाळा व्यवस्थापनाला आता महागात पडणार आहे. असा प्रकार निदर्शनास आल्यास थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडून शाळांना देण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडून शाळा व्यवस्थापनांना पत्र पाठवण्यात आले आहे. धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकीय कार्यक्रम आयोजित केल्यास आणि त्यातही शालेय विद्यार्थ्यांना सहभागी केल्यास कारवाई केली जाणार आहे. अशा प्रकारे आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करण्याची कृती शैक्षणिक शिस्त बिघडवणारी व विद्यार्थ्यांवर चुकीचे संस्कार करणारी असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस बाधा आणणारी आहे. त्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी करून घेऊ नये, असा स्पष्ट उल्लेख क्रीडा विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकात करण्यात आला आहे.

यासोबतच कोणत्याही प्रकारचे राजकीय, संवेदनशील आणि धार्मिक तेढ निर्माण होईल असे कार्यक्रम शाळेच्या आवरात घेण्यासही व्यवस्थापनाला बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा, महापालिका आणि पालिकेच्या शाळा व खासगी शाळांच्या व्यवस्थापनाला क्रीडा विभागाने पत्र पाठवले आहे. बर्‍याचदा राजकीय पुढार्‍यांशी हितसंबंध जोपासून शाळेच्या वेळेत काही शिक्षक राजकारणाशी संबंधित कामे करताना दिसतात. अशा शिक्षकांच्या तक्रारी पालक व सामाजिक कार्यकर्ते करीत असतात. परंतु राजकीय दबावापोटी कारवाई केली जात नाही. मात्र क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार येथून पुढे अशा प्रकारचे कृत्य करणार्‍या शिक्षकांवरदेखील कारवाई केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या