फलटण । Phaltan
फलटण येथे घडलेल्या डॉक्टर युवतीच्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. या घटनेत आरोपी ठरलेल्या निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्यावर अखेर निर्णायक कारवाई करण्यात आली आहे. सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, बदने याला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद 311(2)(ब) नुसार केली आहे.
ही कारवाई केवळ आरोपीवर करण्यात आलेली प्रशासकीय कारवाई नसून, समाजात कायद्याच्या रक्षणासाठी असलेल्या पदाचा दुरुपयोग करणाऱ्यांविरुद्ध शून्य सहनशीलतेचा संदेश सरकार आणि पोलीस विभागाने दिल्याचे मानले जात आहे. फलटण शहरातील एका डॉक्टर युवतीने 23 ऑक्टोबर रोजी आपले आयुष्य संपवले होते. ही घटना स्थानिक हॉटेलमध्ये घडली होती. आत्महत्येपूर्वी तिने तळहातावर लिहून निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्याकडून चार वेळा अत्याचार झाल्याचा आणि इंजिनिअर प्रशांत बनकर याच्याकडून सतत मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. या नोंदीमुळे दोन आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाची चौकशी सुरू झाली.
घटनेनंतर फलटण पोलिसांनी तत्काळ हालचाल करत दोघांनाही ताब्यात घेतले होते. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्यांना जिल्हा कारागृहात हलविण्यात आले आहे. चौकशीदरम्यान गोपाळ बदने याने सेवेत असताना अधिकारांचा गैरवापर केल्याचे, नैतिकता आणि शिस्तीच्या विरुद्ध वर्तन केल्याचे, तसेच समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणारी वर्तणूक केल्याचे समोर आले. यामुळे शासकीय सेवेतील आचारसंहिता मोडली गेल्याचे नमूद करण्यात आले.
विशेष पोलीस महानिरीक्षकांनी नोंदवलेल्या आदेशात, “पोलिस पद हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी, कायदा-सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी असते. या पदाचा वापर वैयक्तिक स्वार्थ आणि दडपशाहीसाठी करण्यात येणे अस्वीकार्य आहे,” असे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेला आरोपींच्या मोबाइल फोनमधून काही महत्त्वपूर्ण पुरावे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या पुराव्यांवर आधारित तपास आणखी वेगाने पुढे नेण्यात येत आहे. तपासाची सूत्रे आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या देखरेखीखाली आहेत. तपास यंत्रणेचे लक्ष आता या घटनेशी संबंधित पुरावे, संभाव्य पूर्वीच्या धमक्या किंवा दबावाचे संदेश, आणि दोन्ही आरोपींचे संभाव्य आर्थिक किंवा इतर संबंध यांचा तपास करण्याकडे आहे.





