लातूर | Latur
दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा (Latur District Bank Election) निकाल आज (सोमवारी) जाहीर झाला. यात काँग्रेस नेते आणि माजी आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनल’ने १९ पैकी तब्बल १४ जागांवर दणदणीत विजय मिळवत बँकेवरील आपले वर्चस्व कायम राखले आहे. तर दुसरीकडे, महायुतीच्या (Mahayuti) ‘परिवर्तन पॅनल’ने ५ जागांवर विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती.
या निवडणुकीत (Election) सर्वांचे लक्ष लागून असलेल्या निलंगा मतदारसंघातून भाजप नेते तथा माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू आणि परिवर्तन पॅनलचे उमेदवार अरविंद पाटील निलंगेकर यांनी विजय मिळवत लातूर जिल्हा बँकेत पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. त्यांनी आपल्या काकी संगीता अशोक पाटील निलंगेकर यांचा पराभव केला. तर भाजपचे लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांचे चिरंजीव ऋषिकेश कराड यांनी परिवर्तन पॅनलकडून निवडणूक लढवत काँग्रेसचे अशोक गोविंदपुरकर यांचा पराभव केला.
तर सहकार पॅनलचे प्रमुख धीरज देशमुख हे देखील विजयी झाले आहेत. तसेच दिवंगत माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांच्या कन्या प्रीती भोसले आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे जावई हेमंत जाधव हेदेखील सहकार पॅनलकडून विजयी झाले आहेत. काँग्रेसने (Congress) सत्ता राखली असली, तरी भाजपने मागील निवडणुकीच्या तुलनेत लक्षणीय कामगिरी करत चांगली पकड निर्माण केल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोणी किती जागा जिंकल्या?
एकूण १९ जागांपैकी ४ जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित १५ जागांसाठी काल (रविवारी) मतदान झाले होते. यामध्ये आज (सोमवारी) निकालाच्या दिवशी सहकार पॅनलने ११ तर परिवर्तन पॅनलने ४ जागांवर विजय मिळविला. त्यामुळे सहकार पॅनलने एकूण १४ आणि परिवर्तन पॅनलने ५ जागा जिंकल्या आहेत.
९९.४ टक्के झाले होते मतदान
दरम्यान या निवडणुकीसाठी रविवारी (दि.१५) रोजी तब्बल ९९.४ टक्के मतदान झाले होते. ९९९ पैकी ९९३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. काँग्रेस नेते धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीही मदत केली होती. तर दुसरीकडे, महायुतीच्या चार आमदारांनी परिवर्तन पॅनेलसाठी ताकद लावली होती. अखेर सर्व राजकीय समीकरणे आणि चुरशीच्या लढतीनंतर लातूर जिल्हा बँकेची सत्ता पुन्हा एकदा काँग्रेसच्या सहकार पॅनेलकडेच आली आहे.
विजयी उमेदवारांची पक्षनिहाय यादी
१. सहकार पॅनलचे विजयी उमेदवार
धीरज देशमुख
हेमंत जाधव (लातूर)
प्रीती भोसले (उदगीर)
आशिष पाटील राजूरकर (जळकोट)
संतोष पाटील (चाकूर)
जगन्नाथ पाटील
जयेश माने
सर्जेराव मोरे
विवेक सिरसाठ
अविनाश जाधव (आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश)
२. परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार
अरविंद पाटील निलंगेकर
अतुल गंभीरे
भगवानराव पाटील तळेगावकर
ऋषिकेश कराड
शोभा पवार




