नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दैवी शक्तींचे दावे, भविष्याची भीती आणि चमत्कारांच्या अमिषापोटी सामान्य भक्तांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या अशोककुमार एकनाथ उर्फ ‘कॅप्टन’ खरात (Ashok Kharat) आणि त्याच्या साथीदारांवरील आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाला सोमवारी (दि. १६) महत्त्वपूर्ण वळण मिळणार आहे. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात (PMLA Court) आज या खटल्याची महत्त्वाची सुनावणी होणार असून, दोषनिश्चितीपूर्वीच्या कायदेशीर मुद्यांवर आणि गैरहजर राहणाऱ्या संशयितांच्या भूमिकेवर न्यायालयाचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.
मागील काही सुनावण्यांमध्ये (Hearing) या गुन्ह्यातील काही संशयित न्यायालयात गैरहजर राहिल्याने विशेष न्यायालयाने नाराजी व्यक्त करत त्यांना कडक शब्दांत तंबी दिली होती. या पार्श्वभूमीवर सुनावणीला सर्व संशयितांची उपस्थिती अनिवार्य असून, न्यायालयाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. या सुनावणीनंतर खटल्यातील दोषनिश्चितीची प्रक्रिया गतीने पुढे सरकण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचालनालयाने (इडी) या प्रकरणात खरातविरुद्ध तब्बल तीन हजार पानांचे विस्तृत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. तपासानुसार, संशयितांनी भक्तांची दिशाभूल करून तब्बल ४२ कोटी ८८ लाख रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या खटल्यात (Case) मुख्य संशयित खरातसह त्याची पत्नी कल्पना, अरविंद पांडुरंग बावके, नामकर्ण यशवंत आवारे, अविनाश वामन कांडेकर आणि मिलिंद दादासाहेब बनकर यांचा समावेश आहे. जरी खरातच्या पत्नीसह इतर संशयितांना सशर्त अटकपूर्व जामीन मिळाला असला, तरी ईडीच्या पुराव्यांचे जाळे त्यांच्याभोवती आवळले गेले आहे. ईडीच्या दोषारोपपत्रातील निष्कर्षांनी सारासार विवेक बुद्धीला थक्क करणारी माहिती समोर आणली आहे. खरात हा स्वतःकडे अलौकिक शक्ती असल्याचा दावा करून साधा चिंचाेका प्रत्येकी तब्बल दोन लाख रुपयांना विकत होता. इतकेच नव्हे तर, बनावट खडे आणि साध्या मधाच्या बाटल्या प्रत्येकी नऊ लाख रुपयांपर्यंत विकून भक्तांना लुटले जात होते, हे तपासात उघड झाले आहे.
३० साक्षीदारांचे जबाब
नाशिकसह सिन्नर, शिर्डी आणि राहता या भागांत खरातविरुद्ध एकूण १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात ईडीने ३० साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. तपास यंत्रणेच्या दाव्यानुसार, फसवणुकीतून गोळा केलेल्या पैशांची मोठ्या प्रमाणावर अफरातफर करून बेनामी मालमत्ता आणि व्यवहारांचे क्लिष्ट जाळे उभे करण्यात आले असून, काही साक्षीदारांना स्थावर मालमत्ता किंवा रोख कर्जाच्या स्वरूपात रकमा मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुन्ह्यांची मालिका आणि बेनामी व्यवहारांचे जाळे
या प्रकरणाची पाळेमुळे नाशिकशी जोडलेली आहेत. २५ मार्च रोजी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्याला आधार देत मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत ईडीने ६ एप्रिल रोजी स्वतंत्र गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.




