सातारा | Satara
साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर तरूणीने आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी महिलेने हातावर सुसाईड नोट लिहिली होती. तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये डॉक्टर तरूणीने PSI गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांच्या नावाचा उल्लेख केला होता. दोघांनी शारीरिक आणि मानसिक छळ केला असल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हंटले आहे. शनिवारी प्रशांत बनकरला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र या घटनेत गोपाळ बदने याने शनिवारी रात्री उशीरा आत्मसमर्पण केले.
या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी संशयित आरोपी प्रशांत बनकरला अटक केली होती, त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा मुख्य संशयित आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने हा पोलिसांना शरण आला, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केले असून या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे.
गेल्या काही तासांपासून गोपाल बदने हा फरार होता. पोलीस त्यांच्या मागावर होते. गोपाळ बदनेचे शेवटचे लोकेशन पंढरपुरात आढळले होते. मात्र, शनिवारी रात्री गोपाळ बदने यांनी आत्मसमर्पण केले. ते स्वत: हून फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. आज त्यांना न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.
अटकेनंतर गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
“मी प्रामाणिक आहे. न्यायालय जो काही निर्णय देईल, त्यावर माझा विश्वास आहे. माझा पोलीस प्रशासनावरही विश्वास आहे,” असे गोपाळ बदने याने पोलिसांसमोर शरण आल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. डॉक्टर तरूणीच्या आत्महत्येमुळे संपूर्ण समाजमन हादरले आहे. एका महिला डॉक्टरला न्याय मिळवण्यासाठी इतक्या टोकाचा मार्ग अवलंबावा लागला, ही बाब अतिशय गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल आणि निपक्ष तपास करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी जनतेतून मागणी होत आहे.
दरम्यान, या आत्महत्येच्या प्रकरणानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी सरकार आणि प्रशासनावर कडक टीका करत पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. पोलिस विभाग आणि आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नेमकं काय प्रकरण काय आहे?
मृत डॉक्टर तरुणीने फलटणमधील एका नामांकित हॉटेलच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर हे दोघे आपल्या आत्महत्येसाठी कारणीभूत असल्याचे डॉक्टर तरुणीने म्हटले होते. तसेच गोपाळ बदने याने आपल्यावर चारवेळा बलात्कार केल्याचेही या सुसाईड नोटमध्ये म्हटले होते. त्यामुळे फलटण पोलीस गोपाळ बदनेच्या मागावर होते. त्याचे शेवटचे मोबाईल लोकेशन पंढरपूर येथे आढळून आले होते. त्यानंतर गोपाळ बदने याने मोबाईल बंद केला होता. मोबाईल लोकेशनचा आधार घेऊन बीड, पुणे आणि पंढरपूर भागात सातारा पोलिसांकडून शोधमोहीम सुरु होती. अनेक तास उलटूनही गोपाळ बदने पोलिसांच्या हाती लागत नसल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. परंतु, शनिवारी रात्री गोपाळ बदने स्वत:हून फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. आता त्याच्या चौकशीतून कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




