Friday, May 3, 2024
Homeनगरअंत्यसंस्कार करण्यापेक्षा देह दान करा - प्रबोधनकार सत्यपाल महाराज

अंत्यसंस्कार करण्यापेक्षा देह दान करा – प्रबोधनकार सत्यपाल महाराज

भेंडा | वार्ताहर

जुन्या रूढी-परंपरेला फाटा देत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापेक्षा शरीररचना शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामी यावा यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांना आपला मृतदेहाचे ‘देहदान’ करावा असे आवाहन सप्त खंजेरी वादक समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज चिंचोलीकर (अकोट) यांनी केले.

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना सांस्कृतिक मंडळाचे वतीने गणेशत्सवानिमित्त आयोजित प्रबोधनपर कार्यक्रमात ते बोलत होते.

सत्यपाल महाराज पुढे म्हणाले, महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाला महत्व दिले. शाळा शिक्षणाची मंदिरे असून शिक्षक माणसाला माणूस बनवतात. देव केवळ मंदिरातच नसतो तर तो माणसात ही असतो.लोकनेते कारखाना व शिक्षण संस्था उभी करणारे लोकनेते मारुतराव घुले पाटील हे देवमाणूसच आहेत. मेल्यानंतर नातेवाईक आपला देह-जुने कपडे जाळून टाकतात,परंतु आपल्या नावावर असलेले सातबारा,सोने-नाणे मात्र जाळीत नाहीत यावरून त्यांना आपला मृतदेह सोडून जमा करून ठेवलेले बाकी सर्वकाही लागते हेच सिद्ध होते.

संत गाडगे बाबा कोणत्याच शाळेत गेले नाहीत परंतु त्यांनी समाजाला लोकशिक्षण दिले,त्यामुळे त्यांचे नावाने आज विद्यापीठ आहे.देवा-धर्माच्या नावावर जाती-जातीत भांडणे लावण्याचा उद्योग सुरू आहे. निसर्गाने दिलेली हवा, पाणी, सूर्य, झाडाची सावली श्रीमंत-गरीब,जाती-धर्माचा भेदभाव करीत नाही.केवळ वर्षातून एकदाच वडाच्या झाडाला फेऱ्या मारून भले होणार नाही तर वर्षभर ऑक्सिजन मिळावा यासाठी वडाचे झाड लावा.डोळे झाकून देवदेव करीत बसण्यापेक्षा देवाचे काम करा आणि झाडे लावा-झाडे जगवा,पाणी आडवा पाणी जिरवा,मातीचे जतन करा,जल पुनर्भरण करा असे आवाहन ही सत्यपाल महाराज यांनी केले.

यावेळी नागेबाबा परिवाराचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, कारखान्याचे सचिव व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष रवींद्र मोटे,कामगार संचालक सुखदेव फुलारी, प्रशासकीय अधिकारी कारभारी गायके,सांस्कृतिक मंडळाचे सचिव दीपक नवले,खजिनदार विष्णुपंत वाबळे, सहसचिव ज्ञानेश्वर आरगडे,मानद सचिव आप्पासाहेब बोडखे, अशोकराव वायकर, सचिन तागड,राजेंद्र चिंधे, जिजामाता विद्यालयाचे प्राचार्य भारत वाबळे, डॉ.जयश्री पवार, सरपंच सौ.उषाताई मिसाळ,गणेश महाराज चौधरी, डॉ. लहाणू मिसाळ,पत्रकार कारभारी गरड, नामदेव शिंदे,संतोष सोनवणे, सूरज दुर्गेष्ट, बाळासाहेब कुसाळकर, अजय देशमुख, चांगदेव जगताप,कृष्णा विधाटे, पोपट उगले, अंकुश घानमोडे, अशोक वांढेकर, श्रीरंग जाधव, अशोक धुमाळ, सचिन मरकड, संदीप उगले, रमेश मते, भास्कर ढाकणे, ज्ञानदेव शिंदे, श्रीकृष्ण मते, कल्याण गायकवाड आदीसह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. जलमित्र सुखदेव फुलारी यांनी सत्यपाल महाराज यांच्या परिचय सादर केला. प्राचार्य भारत वाबळे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या