अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरात विवाहित महिलांवरील छळाच्या दोन घटना समोर आल्या असून, दोन्ही प्रकरणांत हुंड्यासाठी महिलांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही स्वतंत्र घटनांमध्ये संबंधित महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, पतीसह सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत सावेडी परिसरातील पाईपलाईन रस्ता येथे राहणार्या विवाहितेचा जानेवारी 2013 पासून छळ सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यांनी 6 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पती गणेश दिलीप वर्मा, सासु मंगला दिलीप वर्मा (दोघे रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी), नणंद शिल्पा कमलेश वर्मा (रा. हिंगणघाट, जि. वर्धा), नणंद मीना विष्णु कडेल (रा. सोनई, ता. नेवासा), नणंद उमा राधेशाम वर्मा (रा. यवतमाळ), नणंद दिपा नितीन कडेल (रा. माजलगाव, जि. बीड), आत्या चंदा वर्मा (रा. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) व आत्या सुरेखा वर्मा (रा. सिंहगड, पुणे) यांच्या विरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती गणेश याच्यावर असलेले सुमारे 20 लाख रूपयांचे कर्ज फेडण्यासाठी तसेच घरखर्चासाठी माहेरून सहा लाख रूपये आणण्याची मागणी संशयित आरोपींनी केली व त्यातून छळ केल्याचा आरोप आहे.
दुसर्या घटनेत 33 वर्षीय विवाहितेचा एप्रिल 2017 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत सातत्याने छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांनी 6 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पती मुदस्सर अस्लम मालजप्ते, सासु हमीदा अस्लम मालजप्ते, दीर मोहसीन अस्लम मालजप्ते, जाव तमन्ना मोहसिन मालजप्ते (सर्व रा. वडळी रस्ता, आयआयटी कॉलेज समोर, श्रीगोंदा), नणंद आसमा मुदस्सर शेख, नंदवा मुदस्सर शेख (दोघे रा. कुभांर गल्ली, दौंड, ता. दौंड, जि. पुणे) यांच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील फर्निचर बनवण्यासाठी आणि हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून 11 लाख रूपये आणण्याची मागणी सासरच्या मंडळींकडून करण्यात येत होती. यातून छळ करण्यात आल्याचा आरोप आहे.




