नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी ‘रिल’ बनवण्याचे वेड सध्या टवाळखोरांसह काही तरुणाईच्या अंगाशी येत आहे. पुण्यातील एका सराईताचा व्हिडिओ एडिट करून, त्यात स्वतःचे चेहरे लावून नाशिकमध्ये भाईगिरी मिरवणाऱ्या चार तरुणांना गंगापूर पोलिसांनी (Gangapur Police) बेड्या ठोकल्या आहेत. सायबर वॉचच्या माध्यमातून हा प्रकार समोर येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने ही कारवाई केली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : नाशिकच्या ‘निदा’ने रचले धर्मांतर कांड; न्यायालयात खुलासा, तीन नव्या पीडितांना धीर
पुण्यातील एका गुन्हेगाराने (Criminal) शस्त्रांसह मारहाण करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यानंतर, संशयित रुपेश रविंद्र तायडे (वय २०, रा. कॅनॉल रोड, संतकबीरनगर, गंगापूर रोड), जीवक व्यंकट कांबळे (वय २१, रा, शुभश्री प्लाझा, येस बँकेजवळ, पवननगर, सिडको), साहिल ज्ञानेश्वर वायदंडे (वय २०, रा. राजेश्वरी बंगल्यालगत, साई कॉलनी, डी. के. नगर, गंगापूर रोड) व प्रेम बळीराम भदरगे (वय २०, रा. वनविहार कॉलनी, आदित्य हाईट्स शेजारी, पारिजातनगर) अशी संशयितांची नावे आहेत. चौघे ही महाविद्यालयीन शिक्षण घेतात. त्यात एकाची आई वकिली व्यवसायात आहे. या चौघा ‘महाभागांनी’ पुण्यातील मूळ व्हिडिओ उचलला आणि एडिट करुन त्यावर स्वतःचे चेहरे चिकटवले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतर रॅकेट; छळवणुकीला ‘एचआर’ ची साथ, महिलेस पुण्यातून अटक
इतकेच नव्हे तर, गूगल मॅपवर नाशिकचा (Nashik) ‘कॉलेज रोड’ परिसर हायलाईट करून ‘या रगेलांच्या नादी लागू नका’ अशा आशयाची पोस्ट इंस्टाग्रामवर व्हायरल केली. यामुळे परिसरात दहशत पसरली आणि सार्वजनिक शांततेचा भंग झाला. गंगापूर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे या चौघांचा माग काढला आणि त्यांना ताब्यात घेतले. शिवाय पालकांनाही बोलावले. यानंतर, गंगापूर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला. त्याचवेळी या चौघांनाही त्यांच्याच पालकांनी पोलिसांच्या गंगापूर बालेकिल्ल्याचा अनुभव दिला. त्यामुळे तरुणांच्या डोक्यातील भाईगिरीचे भूत उतरले. तर, पुण्यात मूळ रिल तयार करणाऱ्यांवरही आता कारवाईची टांगती तलवार असून, नाशिक पोलिसांच्या या कारवाईमुळे रिलबाजांचे धाबे दणाणले आहेत.
हे देखील वाचा : Nashik Crime News : सुनियोजित ‘हनी ट्रॅप’; कॉर्पोरेट छळाचा ‘नाशिक पॅटर्न’ उघड
‘सोशल मीडियावर भाईगिरी किंवा दहशतीचे उदात्तीकरण करणारे रिल्स पोस्ट करू नका’. अशा कृत्यांमुळे केवळ कायदेशीर कारवाईच होत नाही, तर तरुणांचे करिअरही उद्ध्वस्त होऊ शकते. आम्ही अशा प्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहोत.
अशोक शरमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गंगापूर पोलीस ठाणे




