अकोले |प्रतिनिधी| Akole
महाराष्ट्रात सोयाबिनला आधारभावापेक्षा कमी भाव मिळतोय. मात्र, सरकार केवळ घोषणाच करत आहे. यामुळे उत्पादकांचा खर्च देखील निघत नसल्याने असंतोष खदखदत आहे. यावर सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा. अन्यथा कृषिमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतू, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने डॉ.अजित नवले यांनी दिला आहे.
याबाबत बोलताना डॉ. नवले म्हणाले, ‘मोदी की गॅरंटी’ म्हणून महाराष्ट्रातील सोयाबीनचा प्रत्येक दाणा न् दाणा खरेदी केला जाईल. आणि त्याला आधारभावापेक्षा 4 हजार 892 रुपयांपेक्षा भाव देऊ, असे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले होते.
कृषिमंत्री देखील आत्ता हेच सांगत आहे. मात्र, प्रत्यक्षात साडेतीन ते चार हजार रुपये दर मिळत आहे. यातून उत्पादन खर्च देखील निघत नसून खरेदी केंद्रासमोर गाड्यांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. अनेक शेतकरी निम्म्यापेक्षा जास्त सोयाबीन पडून असल्याने सरकारी खरेदीची मागणी करत आहे. परंतु, सरकार केवळ घोषणा करत आहे. पुरेशी यंत्रणा देत नाहीे, मुदत वाढवत नाही, निधीची तरतूद करत नाही. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्यांमध्ये मोठा असंतोष खदखदत आहे. या पार्श्वभूमीवर किसान सभा चांगलीच आक्रमक झाली असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा. अन्यथा कृषिमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतू, असा इशारा डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.