Friday, September 20, 2024
Homeनगर‘त्यांनी’ साडेसात वर्षे फक्त महसूलमंत्री पदाचा उपभोग घेतला

‘त्यांनी’ साडेसात वर्षे फक्त महसूलमंत्री पदाचा उपभोग घेतला

माजी खा. सुजय विखे पाटील यांचे आ. थोरात यांच्यावर टिकास्त्र

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

साडेसात वर्षे फक्त महसूलमंत्री पदाचा उपभोग घेतला गेला. ‘त्यांनी’ साडेसात वर्षाच्या काळात एकाही खंडकरी शेतकर्‍याला न्याय देण्याचे काम केले नाही. याउलट जे यांना 20 वर्षे होऊ शकले नाही, ते आताचे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून दाखवले. खंडकरी शेतकर्‍यांच्या जमिनी विनामूल्य वर्ग 1 केल्या. अनेक गरिबांना हक्काची घरे मिळाली. हे सर्व महायुती सरकारच्या काळात झाले आहे, असे प्रतिपादन माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

शहरातील थत्ते मैदान येथे राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार तसेच नगरपरिषद अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत 2.0 अभियानांतर्गत शहर वाढीव पाणीपुरवठा योजना (अंदाजपत्रकीय रक्कम 178.60 कोटी) तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर 2.05 कोटी), नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना 1.31 कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना 3.75 कोटी अशा एकूण 7.11 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. प्रसंगी ना. विखे पाटील यांची ग्रंथतुला करण्यात आली. याप्रसंगी माजी खा.सदाशिव लोखंडे, माजी आ.भाऊसाहेब कांबळे, भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, विधानसभा समन्वयक नितीन दिनकर, प्रकाश चित्ते, केतन खोरे, शरद नवले, अभिषेक खंडागळे, विठ्ठलराव राऊत, गणेश राठी, मारुती बिंगले, डॉ.शंकर मुठे, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्यासह खंडकरी नेते इंद्रनाथ पा.थोरात, कॉ.अण्णापाटील थोरात, गंगाधर चौधरी तसेच महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विभागाचे अधिकारी, खंडकरी शेतकरी, बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

माजी खा. डॉ. सुजय विखे म्हणाले, खंडकरी शेतकर्‍यांच्या जमीन वाटपाची लढाई खूप मोठी आहे. वर्ग 1 करून देण्याच्या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचे सुमारे 300 कोटी रुपये वाचणार आहेत. माझ्या येथील उपस्थितीवर राजकारण होईलही परंतु मी माजी खा. स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचा नातू म्हणून खंडकरी शेतकर्‍यांच्या या कार्यक्रमास उपस्थित आहे. त्यांचे या लढ्यात मोठे योगदान आहे. यासाठी वेळोवेळी अनेक आंदोलने झाली. माजी आ.भानुदास मुरकुटे, माजी आ. स्व. जयंत ससाणे यांचेही यात योगदान आहे. श्रीरामपूर तालुक्यातील 5 हजार गरीब कुटुंबाना घरकुले मिळाली होती, परंतु त्यांना जागा उपलब्ध नव्हती. ती ना. विखे पाटील यांनी दिली. 26 एकर जमीन नगरपालिकेला दिली. नगरपालिकेत फक्त मला नगरसेवक व्हायचे हीच स्पर्धा सुरू असते. आता भूमिपूजन झालेल्या 174 कोटी रुपयांच्या पाणी योजनेमुळे शहराच्या पुढील 20 वर्षांचा पाणी प्रश्न सुटला आहे. लोकसभेत तालुक्याने मताधिक्य दिले असल्याने येणार्‍या विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूरचा पुढचा आमदार महायुतीचाच होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दीपक पटारे म्हणाले की, माजी महसूलमंत्री यांनी खंडकरी शेतकर्‍यांसाठी काहीही काम केले नाही. श्रीरामपूर तालुक्याला ना. विखे पाटील यांच्यामुळे कोट्यवधी रुपयांची विकासकामे मिळाली. तसेच अनेकांचा राहण्याचा प्रश्न मिटला आहे. काहीजण फक्त आंदोलने करून नौटंकी करण्याचे काम करतात. यावेळी माजी खा.सदाशिव लोखंडे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, नितीन दिनकर यांचीही भाषणे झाली. शरद नवले यांनी आभार मानले.

आकारी पडीतचा निर्णय आचारसंहितेपूर्वीच..!
ज्याप्रमाणे येथील खंडकरी शेतकर्‍यांना न्याय मिळाला. अगदी त्याचप्रकारे आकारी पडीत जमिनींचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू व्हायच्या आत येथील आकारी पडितांचा प्रश्न निकाली काढला जाईल, असे आश्वासन डॉ. सुजय विखे यांनी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावतीने उपस्थित शेतकर्‍यांना दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या