Wednesday, April 29, 2026
HomeनगरShirdi : शिर्डीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी निघावं

Shirdi : शिर्डीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी निघावं

इच्छापूर्ती झाल्यास साई दर्शनासाठी पायी चालत येणार - डॉ. सुजय विखे पाटील

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी नगरपरिषदेसाठी अनुसूचित जमाती अर्थात आदिवासी बांधवांसाठी नगराध्यक्षपदाची सोडत निघावी याकरिता आपण साईबाबांना साकडे घातले असून, साईबाबांनी याप्रमाणे इच्छापूर्ती केल्यास साईबाबांच्या समाधीचे दर्शनासाठी लोणी ते शिर्डी पायी चालत येणार असल्याचे सुतोवाच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. मंगळवारी सायंकाळी शिर्डीतील एका कार्य्रकमाच्या प्रसंगी डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, सहकारी संस्था म्हटली की गट, तट, नाराजी, मतभेद आणि विरोध असतोच. अनेक तांत्रिक अडचणी असतात.

- Advertisement -

कधी त्या पदासंदर्भात असतात तर कधी मानापानासाठी असतात. याचा अनुभव आम्हाला आहे. मात्र, साईबाबांच्या कृपेने ना. राधाकृष्ण विखे पाटील व विखे पाटील परिवारावर सर्वांचाच विश्वास आहे. गटबाजी असली तरी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे कौशल्य विखे पाटील परिवाराकडे आहे. आगामी अडीच महिन्यावर येऊन ठेपलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यक्ती नगराध्यक्ष पदाचे दावेदार समजतात. आमचे भाग्य आहे की आमच्याकडे प्रत्येक नेता नगराध्यक्ष पदाच्या ताकदीचा आहे. असा मिश्किल टोला लावत शिर्डी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाची सोडत ही अनुसूचित जमाती अर्थात आदिवासी समाज बांधवांसाठी निघावी अशी प्रार्थना आपण साईबाबांकडे केली असून साईबाबांना तसे साकडे घातले आहे.

साईबाबांनी ही इच्छा पूर्ण केल्यास मी स्वतः लोणी ते शिर्डी पायी चालत साई दर्शनासाठी येणार आहे. त्यावेळी सर्व पदाधिकारी आणि नागरिक या निर्णयाचे स्वागत करतील, असा मला विश्वास आहे. सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी बांधवांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली पाहिजे. त्यांच्या हातून सुद्धा विकास साध्य करता आला पाहिजे, याकरिता ही माझी भूमिका आहे. शिर्डीचा विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. मात्र आपल्या महिला, मुली, भगिनी सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच शिर्डीचा योग्य पद्धतीने विकास साध्य करण्याकरिता आपण योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे. विरोधक पॅनल उभे करतील, त्यास हरकत नाही.

मात्र डॉ. एकनाथ गोंदकर असो किंवा विरोधी पक्षातील इतर मान्यवर, त्यांनी शिर्डीच्या विकासाला कधीही विरोध केला नाही अथवा आडकाठी निर्माण केली नाही, ही बाब कौतुकास्पद आहे. सुरक्षित व गुन्हेगारी मुक्त शिर्डी निर्माण करणे हे माझं ध्येय व उद्दिष्ट असून याकरिता मला आपणा सर्वांची साथ लागणार आहे. कुठल्याही वाईट प्रवृत्तीला छोट्याशा आर्थिक स्वार्थासाठी स्थान देऊ नका. आर्थिक फायद्यासाठी अपप्रवृत्तींना डोक्यावर बसवून घेऊ नका. शिर्डीचे स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी विखे पाटील परिवार कटिबद्ध असल्याचे यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी शिर्डीत गुन्हेगारी व अवैध धंदे रोखण्यासाठी चांगल्या प्रकारची कामगिरी करत असल्याचे सांगत पोलिसांचे त्यांनी कौतुक केले.

ताज्या बातम्या

संतोष

Beed News: संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव का झाला? धनंजय देशमुख म्हणाले,...

0
बीड | Beedबीडमधील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनामुळे मस्साजोग येथे पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि...