शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डीमध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेत निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे. शिर्डीतील माता भगिनी सुरक्षित राहाव्यात आणि समृद्ध शिर्डी घडवण्यासाठी विखे पाटील परिवार सातत्याने प्रयत्नशील राहील, सुरक्षित आणि समृध्द शिर्डीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहू, असे प्रतिपादन डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.
छत्रपती शासन यांच्यावतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी छत्रपती शासन व शिर्डी ग्रामस्थांच्यावतीने घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना 7 लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. तसेच शिर्डीतील स्वच्छता कर्मचार्यांच्या 300 कुटुंबांना घरगुती आवश्यक वस्तुंचे वाटपही करण्यात आले. विखे पाटील परिवाराच्यावतीनेही तिन्ही कुटुंबांना 7 लाखांची मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिर्डीत शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी यावेळी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामस्थांनी एकमुखाने अनिष्ट प्रवृत्तींचा विरोध करण्याचा आणि समाजहिताचे निर्णय घेण्यासाठी एकोप्याने राहण्याचा निर्धार केला. याबद्दल डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.
शिर्डीच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शिर्डी बसस्थानकाच्यासमोर शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच शिर्डी सुरक्षित राहावी आणि चुकीची कृत्ये करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. साईबाबा संस्थानच्या टोकन प्रणालीबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांनी यामुळे मंदिर परिसरात दररोज 10 हजार लोकांची गर्दी कमी झाल्याचे सांगितले. मात्र हे 10 हजार लोक कोण होते? याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिर्डीच्या सुरक्षिततेसाठी आणि भक्तांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. कोणीही अन्यायग्रस्त झाल्यास विखे पाटील परिवार त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहील. समाजहितासाठी सत्य बोलायचे असेल, तर त्यासाठी कोणताही विरोध पत्करण्यास आम्ही तयार आहोत असे ते म्हणाले.
यावेळी शिर्डीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी कैलासबापू कोते, शिर्डी सोसायटीचे चेअरमन गोपीनाथ गोंदकर, रमेश गोंदकर, कमलाकर कोते, ताराचंद कोते, नितीन कोते, एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, निलेश कोते, विलासराव कोते, मधुकर कोते, प्रमोद गोंदकर, मनसेचे दत्तात्रेय कोते, हरिश्चंद्र कोते, सुजित गोंदकर, विजय गोंदकर तसेच शिर्डीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त शिर्डीत मोटार सायकल रॅली, रक्तदान शिबीर व विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.