Monday, September 7, 2026
HomeनगरAhilyanagar : एकाच सापळ्यात तीन पोलीस जाळ्यात

Ahilyanagar : एकाच सापळ्यात तीन पोलीस जाळ्यात

श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील लाचखोरीचा पर्दाफाश

अहिल्यानगर/ श्रीगोदा |प्रतिनिधी| Ahilyanagar | Shrigonda

- Advertisement -

जिल्हा पोलीस दलातील वाढत्या लाचखोरीच्या घटनांमध्ये आणखी एका गंभीर प्रकरणाची भर पडली आहे. अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी सात हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे एका सापळा कारवाईत पोलीस दलातील तीन जण अडकल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

नितीन अशोक गाडगे (वय 44), राजेश रावसाहेब जाधव (वय 38) आणि दादाराम शिवराम म्हस्के (वय 56) अशी पकडलेल्या तीन कर्मचार्‍यांची नावे आहेत. तिघांविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया श्रीगोंदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तक्रारदाराच्या भावाचा 1 जून रोजी अपघात झाला होता. त्यानंतर दौंड पोलिसांनी जखमीचा जबाब नोंदवून पुढील कारवाईसाठी प्रकरण श्रीगोंदा पोलीस ठाण्याकडे वर्ग केले होते. अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी नितीन गाडगे याच्याकडे होती. तक्रारदाराने गाडगे याची भेट घेतल्यानंतर त्याला अपघाताची माहिती अ‍ॅपमध्ये भरण्याचे काम पाहणारा राजेश जाधव याच्याकडे पाठविण्यात आले. त्यावेळी जाधव याने अपघाताची माहिती प्रणालीमध्ये नोंदवून गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतःसह नितीन गाडगे याच्यासाठी 10 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने 14 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर 16 जून रोजी एसीबीने केलेल्या लाच मागणी पडताळणीत नितीन गाडगे याने तडजोडीअंती सात हजार रूपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुरूवारी (18 जून) सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान राजेश जाधव याने तक्रारदाराला कोणताही अधिकार नसलेल्या पोलीस चालक दादाराम म्हस्के याच्याकडे पाठविले. म्हस्के यानेही गाडगे याने मागितल्याप्रमाणे सात हजार रूपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. सापळा कारवाईदरम्यान त्याने तक्रारदाराकडून सात हजार रूपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.

तपासात या संपूर्ण व्यवहारात गाडगे आणि जाधव यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांच्या पथकातील अंमलदार चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ, दशरथ लाड यांच्या पथकाने केली. पोलीस निरीक्षक छाया देवरे पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘बॉस’ने सांगितलं म्हणजे विषय संपला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील नेत्यामध्ये माझ्या नावावर सहमती होत नसेल आणि वाद होत असतील, तर मला जिल्हा बँकेच्या पदावर बसण्याची कोणतीही इच्छा नाही, असे स्पष्ट...