अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पाण्याचा अतिरिक्त वापर कमी व्हावा व जमिनीची सुपिकता कायम रहावी, मुख्य उद्देश असलेल्या ठिबक सिंचन योजनेतून लाभार्थ्यांना गेल्या दीडवर्षापासून अनुदान मिळालेले नाही. यामुळे ठिबक सिंचनचे अनुदान मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यातील 6 हजार 327 शेतकर्यांकडून अनुदान मिळणार केव्हा असा सवाल उपस्थित केला जात आहे. गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी 17 कोटी 87 लाख 11 हजार 32 रुपये अनुदानाची वाटप पाहत आहेत.
केंद्र व राज्य शासनाचा 60ः40 हिस्सा असलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेतून ठिबक सिंचन प्रणालीच्या माध्यमातून शेतातील पिकांना पाणी देण्याची व्यवस्था केल्यानंतर शेतकयर्यांना खर्चाच्या सुमारे 80 टक्के रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. यामध्ये पिकानिहाय अनुदानाच्या रकमेत बदल होतो. एकरी 25 ते 30 हजारांचे अनुदान शेतकर्यांना देण्याची तरतूद आहे. ऑनलाइन प्रस्ताव दाखल केल्यानंतर पाहणी करून प्रस्तावास मंजुरी मिळते. यामुळे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करण्यावर शेतकरी भर देत आहेत.
मात्र गेल्या दीड वर्षापासून शेतकर्यांना ठिबक सिंचन योजनेतून अनुदान देण्यात आलेले नसल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी आहे. सध्या निधी उपलब्ध नसल्याने अनुदान मिळण्यात व्यत्यय येत आहे. गेल्या काही वर्षापासून कृषी अनेक योजनांचे अनुदान शेतकर्यांना वेळत उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. ठिंबक सिंचनाकडे शेतकर्यांचा आता कल वाढला आहे. मात्र, अनुदान वेळेत मिळत नसल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.
शेतकरी व रखडलेले अनुदान
संगमनेर- (345) 87 लाख 69 हजार 52, अकोले- (139) 38 लाख 9 हजार 774, कोपरगाव- (560) 1 कोटी 2 लाख 63 हजार 206, राहाता- (739) 1 कोटी 32 लाख 30 हजार 33, अहिल्यानगर- (187) शेतकरी 32 लाख 55 हजार 850 अनुदान, पारनेर- (160) 38 लाख 74 हजार 12, पाथर्डी- (351) 74 लाख 10 हजार 819, कर्जत- (413) 1 कोटी 25 लाख 92 हजार 72, जामखेड- (345) 50 लाख 27 हजार 863, श्रीगोंदा- (547) 1 कोटी 26 लाख 33 हजार 841,श्रीरामपूर- (428) 1 कोटी 39 लाख 29 हजार 393, राहुरी- (439) 1 कोटी 53 लाख 95 हजार 481, नेवासा- (1035) 4 कोटी 12 लाख 83 हजार 396, शेवगाव- (639) 2 कोटी 72 लाख 35 हजार 922 असे आहे.