अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar
जिल्ह्यात नवनवीन घोटाळे समोर येत आहेत. शेतकर्यांसह इतरांना दुप्पट नफ्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचा चुना लावलेल्या घोटाळ्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील गुन्हे शेवगाव व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल आहे. समर्थ ग्रुप ऑफ कंपनीज, समर्थ क्रॉप केअर या नावाखाली शेकडो शेतकर्यांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास कोतवालीचे पोलीस निरीक्षक करीत आहे. त्यांनी या कंपनीचा मुख्य सूत्रधार प्रशांत गवळी याला अटक केली आहे.
तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे 100 गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून अंदाजे 4 कोटी 19 लाख 56 हजार रूपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात ही रक्कम आणखी कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. गुंतवणूकदारांना 20 महिन्यात पैसे दुप्पट, तसेच दरमहा 10 टक्के परतावा (5 टक्के व्याज आणि 5 टक्के मुद्दल) असे आकर्षक आमिष दाखवण्यात आले. या योजनेमुळे अल्पावधीतच शेकडो शेतकरी व इतर लोक या जाळ्यात अडकले. आता त्यांचे पैसे कधी मिळतील याची शाश्वती नाही.
समर्थ ग्रुप ऑफ कंपनीज, समर्थ क्रॉप केअर या नावाखाली असलेल्या सुमारे 30 ते 35 कंपन्यांचा मुख्य सूत्रधार प्रशांत गवळी हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मात्र त्याने हडपसर, पुणे येथे बस्तान बसविले. सर्वसामान्यांना लुटण्याचा ‘साखळी प्लॅन’ तयार केला. आकर्षक व बाजार भावापेक्षा जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून शेकडो जणांना गंडा घातला. गवळी व त्याच्या सहकार्यांनी शेतकर्यांचा माल खरेदी करून तो दुबई व इतर देशात एक्सपोर्ट केला जातो असा भास निर्माण केला होता. प्रत्यक्षात नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील प्रोसेसिंग युनिट केवळ नावापुरते असल्याची माहिती समोर आले आहे. गुंतवणूकदारांना 20 महिन्यात पैसे दुप्पट करण्यासाठी प्लॅन सांगितला जात होता. यामध्ये गुंतवणूकीवर दरमहा 10 टक्के परतावा दिला जात होता. त्यात गुंतवणूकीवरील पाच टक्के व्याज व गुंतवणूक केलेल्या रक्कमेतून पाच टक्के मुद्दल दिली जात होती. अशा आकर्षक आमिषाला अनेक जण भुलले. या योजनेमुळे अल्पावधीतच शेकडो शेतकरी व गुंतवणूकदार या जाळ्यात अडकले.
प्रशांत गवळी याने समर्थ ग्रुप ऑफ कंपनीज या नावाने सुमारे 30 ते 35 कंपन्या स्थापन केल्या असल्याची माहिती आहे. या कंपन्यांच्या बँक खात्यांमधून कोट्यवधी रूपयांचे व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून पैसा जमा करून त्याचा इतर ठिकाणी वापर झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, संपूर्ण आर्थिक व्यवहारांचा तपशील अद्याप तपासाच्या प्रक्रियेत आहे. पोलीस या सर्व कंपन्यांच्या व्यवहाराची, त्यांच्या बँक खात्यांची माहिती घेणार का? असा प्रश्न गुंतवणूकदारांमधून उपस्थित केला जात आहे. पुणे पोलिसांनी प्रशांत गवळी याला अटक केली असून सध्या तो अहिल्यानगर पोलिसांच्या ताब्यात आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड तपास करीत आहेत. त्यांनी गवळी याला अटक केली असून त्याला न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू असून इतर सहकारी पसार आहेत. प्रशांत गवळी याच्यासह त्याची पत्नी ज्योती प्रशांत गवळी, प्रकाश मांगपे, नागनाथ दगडू जाधव, गणेश सुधाकर क्षीरसागर, दत्तात्रय नामदेव बेंगडे, माया अरूण थोरात, अरूण दत्तात्रय थोरात (सर्व रा. हडपसर, पुणे), यासिन बाबू पठाण (भिंगार) व देविदास सावंत (अहिल्यानगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल आहे.
या घोटाळ्यात शेकडो शेतकर्यांनी आपली आयुष्यभराची पुंजी गुंतवली आहे. अनेकांना ना मालाचे पैसे मिळाले आहेत, ना गुंतवणुक केलेली रक्कम व त्यावरील परतावा. त्यामुळे शेतकर्यांमध्ये प्रचंड संताप आणि चिंता निर्माण झाली आहे. पोलीस तपास सुरू असला तरी पैसे परत मिळणार कधी आणि कसे? हा मोठा प्रश्न अनुत्तरित आहे. समर्थ क्रॉप केअर प्रकरण हे केवळ आर्थिक फसवणूक नसून शेतकर्यांच्या विश्वासाचा गंभीर गैरवापर असल्याचे दिसून येत आहे. दुबई एक्सपोर्ट आणि दुप्पट परतावा या आकर्षक घोषणांच्या आड मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. सध्या तपास सुरू असून संपूर्ण घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कलेक्शन सेंटरच्या नावाखाली जाळे
या संपूर्ण घोटाळ्याचा प्रमुख आधार म्हणजे कलेक्शन सेंटर मॉडेल असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक तालुक्यात शेतकर्यांचा माल खरेदी करण्यासाठी केंद्रे उभारण्यात आली होती. ही केंद्रे स्थानिक प्रतिष्ठित व्यक्तींना दिली जात होती. त्यातही त्या व्यक्तीकडून लाखो रूपये उकळले जात होते. त्या सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक मान्यवरांना आमंत्रित केले जात असल्याने या प्रकल्पावर शेतकर्यांचा विश्वास बसला. परिणामी, हजारो शेतकर्यांनी आपला माल व पैसे या यंत्रणेत गुंतवले. मात्र, प्रत्यक्षात काही शेतकर्यांना ना मालाचे पैसे मिळाले, ना गुंतवणुकीवर परतावा मिळाला. काही कलेक्शन सेंटर चालकांनाही कंपनीकडून पैसे न मिळाल्याने संपूर्ण साखळी कोलमडल्याचे चित्र आहे.
राजकीय व प्रशासकीय दबावाचा संशय
प्रशांत गवळी व त्याच्या सहकार्यांनी समर्थ ग्रुप ऑफ कंपनीज या नावाने एक पुस्तिका काढली आहे. त्यात गवळी हा किती मोठा व्यक्ती आहे, त्याचे संबंध, त्याला मिळालेले पुरस्कार, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसोबतचे फोटो आहे. त्याचे संबंध या व्यक्तींसोबत असल्यास तपासावर दबाव असण्याची शक्यता काही गुंतवणूकदारांनी व्यक्त केली आहे. मात्र, गवळी याने पुस्तिकेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांशी आपले संबंध असल्याचे दाखविले. त्यामुळे गुंतवणूकदार त्याच्याकडे आकर्षित झाले आणि त्यांनी गुंतवणूक केली.




