टाकळीभान|वार्ताहर|Takalibhan
अहमदनगर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना बोगस बियाणे मिळाल्यामुळे सोयाबीनची उगवण झाली नव्हती. त्याअनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना बोगस बियाणे पुरवणार्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी 10 जुलै रोजी कृषी आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्यात आले.
यावेळी राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डौले व आयुक्त सुहास दिवसे यांनी आंदोलनकर्ते प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख, प्रहार रुग्णसेवक नयन पुजारी, आझाद फाउंडेशनचे सागर कुंभार यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी कृषी आयुक्त कार्यालयाकडून लेखी पत्र देण्यात आले की, नगर जिल्ह्यात 519 बोगस बियाणे उगवणीच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी तालुका तक्रार निवारण समितीमार्फत 398 तक्रारींची पाहणी करण्यात आली.
तसेच राज्यात एकूण 53,929 तक्रारी प्राप्त झाल्या असून 34,845 तक्रारींची तालुका समितीमार्फत पाहणी करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 1455 शेतकर्यांना संबंधित कंपन्यांकडून भरपाई मिळवून दिलेली असून उर्वरित पात्र शेतकर्यांनाही लवकरच नुकसान भरपाई देण्याचे निर्देश संबंधित कंपन्यांना दिलेले आहेत. तसेच राज्यातील 23 बियाणे कंपन्यांवर विविध ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत. अशी केलेल्या कारवाईची माहिती कृषीचे प्रधान सचिव एकनाथ डौले यांनी दिली.
यावेळी प्रधान कृषी सचिव एकनाथ डौले म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाच्या 25 जूनच्या बैठकीतील निर्देशानुसार सदोष बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करून संबंधित कंपनीकडून शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या कंपन्यांकडून बियाणांच्या दर्जाबाबत शेतकर्यांनी तक्रार करूनही दखल न घेणार्या कंपन्यांचा परवाना रद्द करण्यासाठी नियमानुसार तपासणी करून आवश्यक कारवाई करणार आहोत.
याप्रसंगी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख, प्रहार रुग्णसेवक नयन पुजारी, आझाद फाउंडेशनचे सागर कुंभार आदिंसह नेवासा तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
बियाणे कंपन्यांनी बियाणांची उगवण क्षमता न तपासताच दुप्पट भावाने सोयाबीनचे बियाणे विक्री केल्याने दुबार पेरणीची वेळ आल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांची ओरड होत असल्याने शेतकर्यांच्या मदतीला प्रहारचे जिल्हाध्यक्ष आभिजित पोटे धावून आल्याने शेतकर्यांची लुट करणार्या कंपन्यांवर कारवाई होवून शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
लॉकडाऊनच्या काळातही नगर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या कोणत्याही प्रश्नासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता थेट रेड झोन असलेल्या पुण्यात काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील युटेक शुगरने शेतकर्यांचे सहा महिने ऊस बिल थकवल्याने साखर आयुक्त कार्यालयात आंदोलनाचा इशारा दिल्याने त्या आंदोलनाचीही दखल घेतली गेली होती. आता शेतकर्यांच्याच प्रश्नाबाबत कृषी आयुक्त कार्यालयात आक्रमक आंदोलन करून शेतकर्यांचे प्रश्न वरिष्ठ पातळीवरून सोडवणारे प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे नगर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या गळ्यातील ताईत बनत आहेत.