अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गुंतवणुकीवर 5 ते 15 टक्के आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक करणार्या दोन पसार संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे विमानतळावरून अटक केली. विमानाने परदेशात अथवा अन्यत्र पसार होण्याच्या तयारीत असतानाच ही धडक कारवाई करण्यात आली. आरोपींवर अहिल्यानगरसह महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये फसवणुकीचे तब्बल 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार फिर्यादी योगी महेंद्र सबलोक (रा. कोठला रोड, सर्जेपूरा) व इतर गुंतवणूकदारांना रिजॉईस इव्हेंट ऑर्गनायझर कंपनीच्या व्यवसायवाढीसाठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील पसार संशयितांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी एलसीबीला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, अंमलदार शाहीद शेख, फुरकान शेख, दीपक जाधव, चिमा काळे यांचे पथक संशयितांचा शोध घेत होते.
तपासादरम्यान संशयित पुण्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते पुणे विमानतळावरून विमानाने पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने पुणे विमानतळ पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. या कारवाईत राहुल दर्शन जगताप (वय 44) आणि पायल पी. सॅन्युअल उर्फ पायल राहुल जगताप (वय 40, रा. पुणे) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या तपासात या आरोपींविरूध्द अहिल्यानगरमधील तोफखाना व एमआयडीसी पोलीस ठाण्यांसह मुंबई, ठाणे, मध्यप्रदेश, दिल्ली आणि हरियाणा येथे गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये एमपीआयडी कायद्यांतर्गतही गुन्हे नोंदविण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.




