मुंबई । Mumbai
भारतीय उद्योग जगतातून आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. देशातील आघाडीचा औद्योगिक समूह असलेल्या ‘वेदांता ग्रुप’चे चेअरमन आणि प्रसिद्ध अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या विविध ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अचानक छापे टाकले आहेत. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (FEMA) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय यंत्रणेने ही धडक कारवाई सुरू केल्यामुळे संपूर्ण कॉर्पोरेट जगतात एकच खळबळ उडाली आहे.
वृत्तसंस्था ‘पीटीआय’ (PTI) ने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय यंत्रणेची ही शोधमोहीम सोमवारपासूनच अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू आहे. अद्यापही ही कारवाई सुरू असून ईडीच्या अधिकाऱ्यांकडून विविध कागदपत्रांची कसून चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे, वेदांता ग्रुपने आपल्या महाकाय व्यवसायाचे ६ स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभाजन (De-merger) करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला कर्जदारांकडून मंजुरी मिळवली होती. या मंजुरीला महिनाभरही पूर्ण झाला नसतानाच केंद्रीय यंत्रणेने हा मोठा दणका दिला आहे.
सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वेदांता ग्रुपने आपल्या मूळ परदेशी कंपनीला केलेल्या रॉयल्टी पेमेंटच्या व्यवहारांशी हे छापे जोडलेले आहेत. वेदांता समूहाने ‘फेमा’ कायद्याच्या नियमांना बगल देऊन मोठ्या प्रमाणावर रकमा परदेशात हस्तांतरित केल्याचा संशय केंद्रीय तपास यंत्रणेला आहे. भारताबाहेर होणाऱ्या परकीय चलनाच्या कायदेशीर व्यवहारांवर लक्ष ठेवणे हा ‘फेमा’ कायद्याचा मुख्य उद्देश आहे. जेव्हा एखादी कंपनी किंवा व्यक्ती बेकायदेशीरपणे परदेशात पैसे पाठवते (हवाला), परदेशात अवैध संपत्ती जमा करते किंवा परकीय गुंतवणुकीच्या नियमांचे उल्लंघन करते, तेव्हा ईडीकडून या कायद्यांतर्गत अशी कडक कारवाई केली जाते.
गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण ही कारवाई अशा वेळी झाली आहे, जेव्हा वेदांता ग्रुप आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या पुनर्रचनेच्या अंतिम टप्प्यात आहे. गेल्याच महिन्यात एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनिल अग्रवाल यांनी कंपनीच्या मोठ्या भविष्यातील योजनेचा खुलासा केला होता. त्यानुसार, जुलै २०२६ पर्यंत वेदांता ग्रुपमधून वेगळ्या झालेल्या चारही कंपन्यांचे शेअर बाजारात स्वतंत्रपणे लिस्टिंग पूर्ण होणार आहे. या डीमर्जर धोरणांतर्गत ॲल्युमिनियम, ऑइल अँड गॅस, पॉवर, आणि आयर्न अँड स्टील हे व्यवसाय वेगळे केले जाणार आहेत. मात्र, या प्रक्रियेदरम्यानच ईडीने कारवाई सुरू केल्यामुळे शेअर बाजारात आणि गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या संभ्रमाचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या सुरू असलेल्या छाप्यांविषयी आणि ईडीच्या कारवाईबाबत वेदांता समूहाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य किंवा प्रतिक्रिया जारी करण्यात आलेली नाही. या तपासानंतर काय तथ्य समोर येते, याकडे आता संपूर्ण उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.




