Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : शिक्षणमंत्र्यांचा ‘मराठी’ षटकार...

पडसाद : शिक्षणमंत्र्यांचा ‘मराठी’ षटकार…

 

 

- Advertisement -

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – सल्लागार संपादक

शिक्षण खात्याचा कार्यभार घेतल्यापासून मंत्री दादा भुसे यांना सुखाची झोप काही दिसत नाही. शाळकरी मुलांना थेट मंत्रालयात नेऊन त्यांच्या उपस्थितीत खात्याची सूत्रे त्यांनी घेतली तेव्हाही त्यांच्यावर टीका झाली. नंतर शासनाच्या विविध निर्णयांची माहिती देतांनाही त्यांना अनेकदा आरोपांना, टीकेला सामोरे जावे लागले. आता त्रिभाषा सूत्राचा स्वीकार नव्या शैक्षणिक धोरणात केल्यानंतर राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या शासनादेशावर तर राज्यभर टीकेचे मोहोळ उठले. विरोधी पक्षांना तर जणू कोलीतच मिळाले. अखेरीस हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे त्यांना जाहीर करावे लागले.

प्रत्यक्षात या निर्णयाचा शासन आदेश शाळा सुरु होत असतांनाही आला नसल्याने पुन्हा एकदा मंत्रिमहोदयांना टीकेचे धनी व्हावे लागले. अखेरीस शाळा सुरु झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी हा आदेश आला खरा परंतु, त्यामध्ये किमान वीस विद्यार्थ्यांनी मागणी केली तरच हिंदीऐवजी अन्य भाषेचा पर्याय निवडता येणार असल्याचे भुसेंनी जाहीर केले. यामुळे हिंदीची सक्ती छुप्या पद्धतीने पुन्हा आणली गेल्याचा आरोप विरोधकांबरोबरच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरही व्यक्त करीत आहेत. एकूणच काय तर जे खाते गेल्या वीस – पंचवीस वर्षांपासून सातत्याने वादग्रस्त निर्णयांमुळे बदनाम झाले, त्यातील सातत्य यंदाही कायम राहिलेले दिसते आहे.

भुसेंना खरे तर ग्रामीण भागात काम करायला आवडत असल्याने त्यांनी ग्रामविकास किंवा जलसंधारण अशी ग्रामीण जनतेशी नाळ जोडणारी खाती मिळावी अशी अपेक्षा ठेवली होती. परंतु त्यांच्याकडे शिक्षण खाते आले. पदरी पडले पवित्र झाले, अशी त्यांची धारणा असल्याने त्यांनी पक्षादेश मानून गपगुमान हे खाते स्वीकारले. हे खाते म्हणजे कशी सुळावरची पोळी आहे, हे एव्हाना त्यांच्या चांगलेच लक्षात आले असणार. आपल्या परीने ते या खात्याचा किल्ला लढवीत आहेत. या खात्याचा सामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत थेट संबंध येतो. त्यामुळेच त्याच्याशी संबंधित निर्णयावर सर्वच स्तरातील लोक व्यक्त होतात.(खरे तर तुटून पडतात, हाच शब्द योग्य ठरावा.) तर, अशा या खात्याचे शिवधनुष्य पेलणारे दादा भुसे यांनी राज्यातील सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी भाषा ही सक्तीची असल्याचे वारंवार सांगूनही तिसर्‍या भाषेच्या सक्तीचा विषय डोके वर काढत असल्याने ते वैतागले असल्यास नवल नाही.

विशेष म्हणजे या विषयात त्यांना मदत करायला किंवा त्यांच्या पाठीशी रहायला एकही मंत्री पुढे येत नाही. त्रिभाषा धोरण ही खरे तर केंद्राची भूमिका असल्याने किमान भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी तरी याबाबत त्यांची पाठराखण करायला हवी. परंतु दुर्दैवाने या प्रकरणात दादा एकटे पडलेले दिसतात. आता ताज्या पत्रकार परिषदेतही त्यांनी जे काही सांगितले त्यावरुन हिंदीच्या सक्तीचा छुपा अजेंडा पुढे आल्याचा दावा केला जात आहे. या सगळ्याच विषयाला तोंड देण्यापेक्षा दादांनी मालेगाव या आपल्या गावातील मराठी माध्यमाच्या शाळेत आपल्या दोन्ही नातींचा प्रवेश घेऊन षट्कार ठोकला. विरोधकांच्या आरोपांना प्रत्यक्ष कृतीनेच उत्तर देण्याचा केलेला हा प्रयत्न चर्चेत आला आहे. मालेगाव येथील सर्वोदय शिक्षण संस्था संचलित प्राथमिक विद्यामंदिरच्या बालवाडीच्या वर्गात अहिल्या अजिंक्य भुसे व भवन्या आविष्कार भुसे या दोघींचा प्रवेश नुकताच झाला. भुसेंच्या पत्नी अनिता यांनी शाळेत जाऊन हे प्रवेश घेतल्याचे प्रसिद्ध झालेल्या वृत्तावरुन दिसते.

भुसेंची दोन्ही मुलेही याच शाळेत शिकले आहेत. विशेष म्हणजे आपल्या नाती मराठी शाळेत जाणार म्हणून भुसेंनी कोणताही गाजावाजा केला नाही. किंबहुना आपण काही जगावेगळे करतोय याचा देखावाही केला नाही. तरीही बातमीला पाय फुटले आणि शिक्षण मंत्र्यांच्या नाती मराठी शाळेत हा केवळ बातमीचाच नव्हे तर कौतुकाचाही विषय झाला. ‘लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण’ या उक्तीचा वारंवार प्रत्यय येत असल्याच्या आजच्या जमान्यात मराठी भाषा टिकावी, ती वृद्धिंगत व्हावी यासाठी केवळ कंठशोष न करता त्यासाठी स्वत:च्या घरापासूनच प्रत्यक्ष कृतीची सुरुवात करण्याचा चांगला पायंडा दादा भुसे यांनी पाडला आहे. शिक्षण खात्यातील त्यांच्या काही निर्णयांविषयी दुमत होवू शकते. किंबहुना गेल्या काही काळापासून त्यांच्या निर्णयांवर टीकेचे आसूड ओढले जात आहेच. परंतु त्यासंदर्भात कोणतीही आदळआपट न करता कमालीच्या संयमाने दादा हा विषय हाताळत आहेत.

नाशिकमधीलच त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी माणिकराव कोकाटे यांनी खरे तर कमी पण नेटके बोलण्याचा दादांचा हा आदर्श घ्यायला हवा. कोकाटे केवळ बोलबच्चनमुळे अडचणीत आले तर भुसे मोजके बोलण्यामुळे विरोधकांच्या रडारवर राहूनही नामानिराळे राहिले. आता तर त्यांनी सरकारवर मराठीबाबत दुजाभाव केला जात असल्याच्या आरोपाला असे काही उत्तर दिले की ज्याचे नाव ते! याउलट आता आरोप करणार्‍यांची मुले कोणत्या माध्यमात शिकतात याची कुंडली लोक काढतील. राजकारणात टायमिंगला अनन्यसाधारण महत्त्व असते असे म्हणतात. राज ठाकरे यांच्या राजकीय टायमिंगला पूर्वी महत्त्व दिले जायचे. हल्ली त्यांचेही टायमिंग चुकत चालले हा भाग अलाहिदा! नाशिकमध्ये अचूक राजकीय निर्णयासाठी कै. उत्तमराव ढिकले यांचा लोक नेहमी हेवा करायचे. वेगवेगळ्या पक्षात जाऊन त्यांनी त्यांना जे जे हवे ते मिळविले.

सध्या त्यांचे चिरंजीव राहुल यांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकीय टायमिंग अचूक साधत निर्णय घेतल्याने दुसर्‍यांदा ते आमदार झाले आहेत. कोकाटे हे ढिकलेंचे एकेकाळचे शिष्य. पण केवळ फटकळपणामुळे बदनाम झाले. गंमत म्हणजे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप न होता देखील ते वादग्रस्त झाले, बदनामही झाले. दादा भुसे शिक्षण खात्याकडून असलेल्या प्रचंड अपेक्षांमुळे दबावाखाली राहिले. काही निर्णयांमुळे बचावातही गेले. परंतु तोंडावर ताबा ठेवत ऐनवेळी नातींना मराठी शाळेत टाकून टीकाकारांना परस्पर उत्तर देऊनही मोकळे झाले. पक्ष संघटनेतील गटबाजीतही दादा नेहमीच खुश्कीच्या मार्गाने स्वत:ची सुटका करुन घेत आले आहेत. आता मात्र लोक नाव काढतील असे काम दादांना करुन दाखवावे लागेल. शेवटी पंचवीस – तीस वर्षांचा सांसदीय कामाचा अनुभव ठोस कामातूनच दिसायला हवा.

ताज्या बातम्या

मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश; आ.रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते...

0
पंढरपूर शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित...