दे. कॅम्प । वार्ताहर Devlali Camp / Bhagur
कोविड ( Covid ) काळात शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वंजारवाडी येथील अमित पंड्या विद्यालयाच्या ( Amit Pandya vidyalaya ) वतीने वस्ती वाड्यावर चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे.
शिक्षण मंडळ भगूर संचलित अमित पंड्या विद्यालया वंजारवाडी येथील शाळेतर्फे शिक्षणा विषयी माहिती सांगणारा बोलका चित्ररथ परिसरातील गाव व वाड्यांमध्ये फिरविला जात आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुख्याध्यापक प्रवीण रोकडे हे स्वतः पालकांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथराव शेटे यांनीं सांगितले की, संस्थेने 1967 मध्ये शिक्षण मंडळ भगूर या संस्थेचे रोपटे लावले. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
संस्थेच्या सर्व शाळांचे निकाल उत्कृष्ट लागत आहे. यामागे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांचे अतोनात परिश्रम आहेत. शिवाय आमच्या शाळा बहुतांश ग्रामीण भागात आहेत. त्यात वंजारवाडी येथील अमित पंड्या शाळा देखील आहे. या भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेऊन देशसेवेसाठी पोलीस व संरक्षणदलात रुजू झाले आहेत. तर विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षा देत आहे.
यावेळी संस्थेचे कार्यवाह मधुसूदन गायकवाड यांनी खेड्यातील विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केल्याने व सुविधा उपलब्ध करून दिल्याने कोविड काळात ऑनलाईन शिक्षणसाठी पालकांचा व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. यावेळी वंजारवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, उपसरपंच बाळू लोहरे, तुकाराम शिंदे, ग्रामसेवक योगेश पगार, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.