Friday, May 3, 2024
Homeब्लॉगफुका मृगजळा अंकूर नाही..

फुका मृगजळा अंकूर नाही..

समाजात जीवन व्यतित करताना शिक्षण घेतलेल्या माणसांच्या आयुष्यात शहाणपण जीवनात अधोरेखित होताना दिसत नाही असा साधारण सर्वदूर अनुभव आपल्या जीवन व्यवहारात पहायला मिळतो. तसे सातत्याने बोललेही जाते. शिकलेली माणसं अक्षरानी साक्षर आणि माहितीने शिक्षित होता आहेत. शिक्षण घेतल्यानंतर जीवन जगण्यासाठी आणि सामाजिक जीवन व्यवहारात जो सुशिक्षितपणाचा भाव प्रतिबिंबीत होण्याची गरज असते ती होताना दिसत नाही.

वर्तमानात आपल्या सामाजिक जीवनात दिसणा-या समाजातील अनेक प्रश्नाचे मूळ शिक्षणात आहेत का? असा प्रश्न पडतो. शिक्षण हे जीवन व्यवहारात निर्माण होणा-या समस्याचे निराकरणासाठी, जीवन उन्नत बनविण्यासाठी आहे. मानवी जीवनाच्या विकासाबरोबरच समाज व राष्ट्र प्रगत करण्यासाठी शिक्षणाचा उपयोग होण्याची गरज असते. आपले समग्रजीवनच समृध्द आणि विवेकशील व्हावे या करीता शिक्षणातून होणारी पेरणी महत्वाची असते. ते पेरणी कशी आणि कोठे झाली? हे महत्वाचे.

- Advertisement -

पेरीले जैसे बीज तैसे फल…

शिक्षण म्हणजे चार भिंतीच्या आत पाठयपुस्तकाचा आशय शिकविणे नाही. पाठयपुस्तकाचा आशय शब्दातून नव्हे तर हदयाच्या भावनेतून पोहचविणे असते. शिक्षणाचा मार्ग पुस्तकाच्या शब्दातून नाही तर हदयातील प्रेमाच्या भावनेतून जातो असे म्हणतात. जे हदयाशी नाते सांगते तेच खरे शिक्षण असते. पुस्तकात असलेले शब्द केवळ शब्द असत नाही. त्यातील भाव महत्वाचे असतात. ते भाव विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहचतात त्यावरच बालकांचे शिक्षण अवलंबून असते.

अध्यापन करताना केवळ शब्दांचे जंजाळ असणार असेल तर त्याचा परिणाम हदयावरती होण्याची शक्यता नाही. अशा स्वरूपाचे शिकणे हे पुस्तकी आणि परीक्षेपुरते असणार आहे. त्यातून “मार्काचा” आलेख उंचावेल पण “गुणांचा” नाही. हदयाशी नाते न सांगणारे शिक्षण हे केवळ माहितीने युक्त असते. ते ज्ञानाच्या प्रक्रियेत रूपांतरीत होत नाही. ज्ञानाची प्रक्रिया होण्यासाठी करून पाहणे महत्वाचे, त्याकरीता शिक्षण होताना पेरले जाणारे शब्द हदयात रूजायला हवीत. ती रूजली तर पुन्हा पुन्हा कृती करणे घडते. अन्यथा शब्दांच्या सोबत चालणे घडते, मात्र ते चालणे म्हणजे संगत नसते तो वरवरचा प्रवास असतो. त्यामुळे शिकणे झाल्यासारखे वाटते पण तो शिकण्याचा प्रवास अजिबात असत नाही हे खरे.

अवधान एकले देईजे…

शिकताना आपण अर्थ पेरायचा असतो. तो केवळ सांगून पेरला जाणे शक्य नसते. तो रूजवायला हवा असतो. रूजविण्या करीता शेतकरी जे कष्ट घेतो तितकेच शिक्षणाच्या प्रक्रियेत कष्ट आणि काळजी घ्यावी लागते. तसे केले तरच पाठाचे मूल्य रूजण्याची शक्यता असते. शब्दांना अर्थ असतो आणि तो अर्थ जगण्यातून प्रतिबिंबीत होण्याची गरज आहे. शब्दांना असलेला अर्थ कोरडा असले तर तो रूजत नाही. परवा एक मित्र म्हणत होता की “अरे माझा एक मोठा अधिकारी असलेला मित्र आहे. त्याला अधिकार आहे.. तो अनेकदा बैठकीत बोलतो खूप.. पण त्याच्या बोलण्याचा प्रभाव पडत नाही. त्याच्या मनात नेहमी अस्वस्थता असते. त्या उलट कनिष्ठ अधिकारी आहे मात्र त्याचा प्रभाव समोरच्या लोकांवरती तात्काळ प्रभाव पडतो”.

खरेतर श्रेष्ठ की कनिष्ठ यांच्यात कोणाचा प्रभाव पडतो.. ते त्याच्या पदावर अवंलबून असत नाही. आदेशाचे पालन म्हणून वरीष्ठांनी सांगितले तसे होईलही, पण प्रभाव नाही पडणार, मात्र कनिष्ठ असलेल्या व्यक्तीचा प्रभाव पडतो. तो प्रभाव पडणे श्रेणीवर नाही तर पेरणारा माणूस पेरल्या जाणा-या विचाराशी किती प्रामाणिक आहे यावरच अवलंबून असणार आहे. आपण जे काही पेरतो आहोत त्यातील भाव प्रामाणिक असणे आणि तो भाव जीवन प्रवास तत्व, मूल्यांसाठी सुरू असणे असेल तर तुम्ही कितीही कनिष्ठ अधिकारी असा, समाज मनावर प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. सतत पैशा खाणारा आणि त्यासाठी नस्ती अडविणारा अधिकारी भ्रष्टाचार मुक्ततेच्या दिवशी शासनाच्या आदेशाने शपथ घेताना कितीही उपदेश केला तरी त्याचा प्रभाव पडणार नाही.

आधी स्वतःकडे पहा..

त्याचे भाषण आणि शब्द म्हणजे फुकाची बडबड आहे. प्रभाव पाडण्यासाठी शब्द नाही तर त्या शब्दांसाठीचा प्रामाणिकपणा असायला हवा असतो. प्रेम करा असे सांगून प्रेमाचा अनुभव असावा लागतो. त्याकरीता सांगणा-याच्या डोळ्यात प्रेमाचे भाव आणि हदयात प्रेमाची ओढ असेल तर ते शब्द हदयात पोहचतात. शिक्षण हे शब्दांने नाही तर हदयानेच होते. शब्दाचे भाव पोहचण्यासाठी हदय अधिक संवदेशनशीलता असायला हवी असते. ती जितकी संवेदनशील असेल तितके शिक्षणात गुणवत्ता उंचावलेली पहावयास मिळेल.

शिक्षण आणि जगणे यांचे एक नाते आहे. शिकणे जितके जीवनाभिमुख असेल तितकी गुणवत्ता अधिक असते. शिक्षणाचा अर्थ जगण्यातूनच उलगडत जातो. श्रमाचे मोल केवळ शब्दाने नाही तर जगण्यातून कळत जाते. शब्दाचे अर्थ जितके प्रत्यक्ष जगणे आणि कृतीतून जाणता येतील तितके शिकणे परिणामकारक होणार आहे. शिक्षण अर्थपूर्ण असायला हवे याचा अर्थ पुन्हा शब्दाच्या गर्दीत डोकावणे नाही. संत तुकोबा म्हणाले होते की, अर्थेवीन पाठांतर कासया करावे. व्यर्थेची मरावे घोकोनिया.. त्यामुळे शब्द पाठ करून हाती काही लागत नाही. शब्दांना अर्थ असतो आणि तो जगण्याच्या प्रक्रियेत जाणायचा असतो. असा अर्थ जगलेली माणसं आचार्य असतात.

घर हीच शाळा…

आचार्य ही पदवी नाही तर तो जीवन प्रवास आहे, त्या प्रवासात शब्दांना अर्थ देणे असते. एका अर्थाने आचार्य बनलेली माणसं ही समाजासाठी आदर्शाची पाऊलवाट असतात. “महाजन येण गतःस पंथा” असे म्हटले जाते. ही महाजन म्हणजे कोण? तर जी माणस समृध्द जीवन जगतात आणि त्यांचे जगणे हाच त्यांचा जीवन प्रवास असतो. अशीच माणस समाज मनावर परिणाम करतात. नुकतेच निधन झालेल्या सिंधूताई सपकाळ यांचा समाज मनावर पगडा होता. त्यांच्या शब्दात शक्ती होती. ती त्यांच्या जीवन प्रवासाच्या अनुभवाने भरलेली होती. त्या ज्या जगल्या ते शब्दात प्रतिबिंबीत झाले म्हणून ते लोकांच्या हदयाला भिडले. शब्द तेच असतात. त्या शब्दांना अनुभवाची जोड असावी लागते.

जेव्हा ते जीवन अनुभावतून येतात तेव्हा ते हदयाला स्पर्श करून जातात. शिक्षणातही तसेच असते. आपण बालकांना धडे शिकवितो मात्र ते धडे आणि त्या पाठातील आशय आपल्या जगण्यातील अनुभवाशी नाते सांगणारे नसेल तर कोरडेपणाने शब्दांचा प्रवास सुरू राहतो. मग ते शब्द सांगणा-या माणसांचा समोरच्याच्या मनावर प्रभाव पडत नाही. संताच्या मार्गाने लाखो लोक का जाता आहेत..? तेथे त्यांना कोणताही आर्थिक लाभ नाही. त्यांना कोणी निमंत्रण देत नाही. कोणताही आग्रही नाही, मानसन्मान नाही तरी त्या वाटा लोक चालत राहातात याचे कारण ती वाट अनुभव समृध्दतेची आहे. ही समृध्दता म्हणजे ज्ञान निर्मितीची प्रक्रिया आहे. शिक्षणही त्याच दिशेन घडत जाणे महत्वाचे आहे.

मैदानांची वाट हवी..

ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज असेच काही सांगू पहाता आहे. मन बुध्दी शब्दा कारणे/ ज्ञान कळले ऐसे वाटणे/ परि मृगजळाच्या त्या ओलाव्याने/अंकूर नाही 9/137. आपण अनुभवाच्या शिवाय केवळ शब्दांच्या जोरावरती, शब्दांच्या सोबतीने चालताना आपल्याला ज्ञान झाले असे वाटत जाते. ते शब्द म्हणजे केवळ माहिती असते. माहितीने माणस संपन्न होतील पण ज्ञानी होतील का? माहिती फक्त मस्तकाला स्पर्श करेल पण ज्ञान मात्र हदयाला स्पर्श करीत जाते. शब्दांच्या सोबत चालणे हे ज्ञान निर्मिती नाही.. तर अनुभवाच्या सोबत चालल्याने ज्ञानाची निर्मिती होते. त्यामुळे शिक्षण अनुभवाधारित असायला हवे.

शिक्षण पुस्तकातील शब्दांतून नाहीतर शब्दांच्या अनुभवाने फुलत जाते. त्यामुळ ज्ञानेश्वर महाराज म्हणाले होते, की जसे चांगले अंकूर फुलण्यासासाठी पाण्याचा ओलावा आवश्यक असतो. तो ओलावा जमिनीत येण्यासाठी पाणी द्यावे लागते तरच लावलेल्या बी ला अंकूर फुटेल. अन्यथा केवळ मृगजळाचा ओलावा असेल तर अंकूर फुटणार नाही. त्याप्रमाणे शिक्षणात प्रेमाचा ओलावा असेल तरच ज्ञानाचे अंकूर फुलतील.. अन्य़था शिक्षणाची प्रक्रिया म्हणजे केवळ माहितीचा प्रवास ठरेल.

तुम्ही फक्त इतकेच करा..!

तो प्रवास व्यक्तीच्या जीवनात शहाणपणाची पेरणी नाही करू शकणार. शिक्षणाचा हेतू नेमका काय आहे आणि त्यासाठीचा प्रवास आपण कसा घडवितो त्यावरच बरेच काही अवंलबून आहे. त्यामुळे संतानी सांगितलेली जीवनाची वाट जशी व्यक्तीला परमोच्च आनंदाला घेऊन जाईल त्याप्रमाणे त्या वाटेचा विचार केला तर शिक्षणालाही एका उंचीवर घेऊन जाण्यासाठी तो विचार उपयोगी पडणारा आहे.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या