Friday, May 3, 2024
Homeनाशिकभरधाव आयशरने दोन दुचाकीस्वारांना उडवले

भरधाव आयशरने दोन दुचाकीस्वारांना उडवले

पंचवटी । Panchvati

तपोवन परिसरातील साधुग्राम मधील रस्त्याने भरधाव वेगात जाणाऱ्या आयशर वाहनावरील वाहन चालकाचा ताबा सुटून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना गुरुवारी (दि.१८) घडली.

- Advertisement -

यात एक १६ वर्षीय युवक जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला असून, खाजगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आडगाव पोलीसांनी आयशर चालकास ताब्यात घेतले असून, उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

तपोवन परिसरातील चव्हाण मळ्याकडून साधुग्राम मधील तपोवन नर्सरीच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर गुरुवारी (दि.१८) दुपारी दोन वाजेच्या सुमारास आयशर (एमएच १५, एफव्ही ७११२) भरधाव वेगात येत होता. यावेळी या मार्गावर रस्त्याच्या कडेला दोघेजण आपापल्या दुचाकीवर बसून गप्पा मारत होते.

या सुमारास आयशर वाहनावरील चालकाचा ताबा सुटला आणि थेट उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिली. हा अपघात इतका जबरदस्त होती की, दुचाकीसह त्यावर बसलेल्या दोघा युवकांना सुमारे दहा ते पंधरा फूट पुढे ओढत नेले. या घटनेत प्रथमेश जाधव (वय १६, राहणार, हनुमानवाडी, पंचवटी) हा युवक जागीच ठार झाला.

त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. तर त्याचा मित्र संकल्प मुळे (२५, रा.हनुमानवाडी, पंचवटी) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर याठिकाणी जवळच असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर जाऊन आयशर धडकला.

सुदैवाने या पत्र्याच्या शेडमध्ये यावेळी कोणी नव्हते अन्यथा आणखी जीवितहानी झाली असती. घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करीत आयशर चालकास ताब्यात घेतले.

याप्रकरणी उशिरापर्यंत आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या