एकलहरे । वार्ताहर Eklahare
प्रस्तावित प्रकल्प 660 मेगावॅटचे काम दहा वर्षांपासून रखडले असून सरकार आता त्याकडे लक्ष देण्याचे सोडून रतन इंडिया भागीदारीत घेण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप प्रकल्प बचाव समितीचे अध्यक्ष शंकर धनवटे यांनी केला. या निषेधार्थ दि. 1 जानेवारी रोजी होणार्या रास्ता रोकोत सर्व लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन नाशिकचे भूषण वाचवावे असे आवाहन त्यांनी केले.
देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी एकलहरे वीज प्रकल्प वाचविण्यासाठी पुढे यावे, अन्यथा रस्त्यावर फिरु देणार नसल्याचा इशारा प्रकल्प बचाव कृती समितीने दिला आहे. आ. सरोज आहिरे यांच्या कार्यालयात प्रकल्प बचाव कृती समिती यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. सिन्नरचा खाजगी वीज प्रकल्प सुरु करण्याच्या विरोधात एकलहरेतील आंदोलक आक्रमक झाले असून परिसरातील कामगार, शेतकरी आणि व्यावसायिकांसह प्रकल्प बचाव कृती समितीने तीव्र विरोध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कृती समिती व आ. सरोज आहिरे यांच्यात चर्चा झाली. यावेळी समितीचे अध्यक्ष शंकरराव धनवटे यांनी एकलहरे प्रकल्प वाचविण्यासाठी आमदारांनी ठाम भूमिका घेऊन एकलहरे प्रकल्प वाचविण्यासाठी पुढे यावे, अन्यथा मतदार संघात फिरु देणार नाही, असा गंभीर इशारा दिला. कृती समिती व आमदार यांच्यातील चर्चेत चांगलीच खडाजंगी झाली. आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल झालेल्या बैठकीत कृती समितीचे अध्यक्ष शंकरराव धनवटे, सचिव बळीराम कांबळे, उपाध्यक्ष सागर जाधव, चंद्रशेखर आहेर, स्थानिक शेतकरी साहेबराव शिंदे, संतोष जायगुडे, प्रशांत पाटील, शानू निकम, आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांना साकडे
प्रस्तावित प्रकल्पाचे काम लवकर सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांंना निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नाशिक तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे व कार्यकर्त्यांनी भुजबळ यांना साकडे घालत एकलहरेच्या 660 मेगावाट प्रकल्पाबाबत इत्थंभूत माहिती दिली.
येथील वीज दराबाबत पुन्हा एकदा तज्ञांंसोबत चर्चा करुन उर्जा मंत्र्यांसोबत बैठक घेऊ तेव्हा एकलहरेच्या शिष्टमंडळालाही विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन भुजबळ यांनी दिले. यावेळी विष्णुपंत म्हैसधुने, सागर जाधव, रामदास पाटील, आसाराम शिंदे, शानु निकम, उमेश जाधव, बंटी पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.