
परभणी । Parbhani
शेतकरी, युवक आणि मराठा आरक्षण या मुद्द्यांमुळे चर्चेत असलेल्या परभणीतील शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात रविवारी एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहताच सभास्थळी उपस्थित काही जणांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. या घोषणांमुळे काही काळ वातावरणात उत्सुकता निर्माण झाली. मात्र, परिस्थिती शांत ठेवत शिंदे यांनी आंदोलकांविषयी संयमाची भूमिका घेत पोलिसांना त्यांच्याशी सौम्य पद्धतीने वागण्याच्या सूचना दिल्या.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाकडे राज्यभराचे लक्ष लागले होते. शिंदे यांचे भाषण सुरू होताच घोषणाबाजी झाली. त्यावेळी त्यांनी, “ते आपलेच लोक आहेत. त्यांना अडवू नका, आवश्यक असल्यास मंचावर बोलवा,” अशा सूचना पोलिसांना दिल्याचे कार्यक्रमस्थळी पाहायला मिळाले. तसेच, “आपल्याच लोकांना बाजूला थांबू द्या,” असेही त्यांनी सांगितले.
यानंतर भाषणाला सुरुवात करताना एकनाथ शिंदे यांनी उपस्थित नागरिकांचे स्वागत केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील विराट सभांची आठवण करून देत त्यांनी, त्यांच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने हजारो महिलांनी राखी बांधल्याचा उल्लेख करत, “मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री ही पदे महत्त्वाची असली तरी ‘लाडक्या बहिणींचा भाऊ’ हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे,” असे ते म्हणाले.
शेतकरी कल्याणाबाबत बोलताना शिंदे यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख केला. केंद्र सरकारच्या मदतीबरोबरच राज्य सरकारकडूनही शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. “शेतकरी संकटात असताना सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकरी, युवक आणि लाडक्या बहिणींचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी अलीकडील पक्षप्रवेशांचा उल्लेख केला. खासदार बंडू जाधव यांनी घेतलेला निर्णय हा परभणीच्या विकासासाठी तसेच शेतकरी आणि युवकांच्या हितासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. परभणीच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य सरकार करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. “डबल इंजिन सरकार विकासाची गती कायम ठेवेल आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहील,” असे आश्वासन देत त्यांनी भाषणाचा समारोप केला.
दरम्यान, घोषणाबाजीच्या घटनेनंतरही कार्यक्रम शांततेत पार पडला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. या कार्यक्रमातील घोषणाबाजी आणि त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेली संयमी प्रतिक्रिया सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.




