दिल्ली । Delhi
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर येणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान होणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून एकनाथ शिंदे यांचा खास सन्मान करण्यात येणार आहे. या कारणासाठी आज दिल्लीत शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. आज दिल्लीत शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना देण्यात येईल. 5 लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असं पुरस्काराचं स्वरुप आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते एका मंचावर येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे आजारपणामुळे राजकारणापासून, मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता शरद पवार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीत एकत्र दिसणार असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.