नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation Bill) नामंजूर होताच सत्ताधारी रस्त्यावर उतरत विरोधकांनी लोकशाहीची कशी हत्या केली, याबाबतची टीका करत आहेत. भाजपच्या या टीकेला प्रतित्युत्तर देण्यासाठी काँग्रेसही आता मैदानात उतरली आहे. काँग्रेसचे (Congress) माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवार (दि.२२) येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. महिला आरक्षणाचे नाव पुढे करून मांडण्यात आलेली १३१ वी घटनादुरुस्ती हा लोकशाहीवर मोठा आघात होता. तो हाणून पाडण्याचे काम विरोधी पक्षांनी केले आहे. जनगणनेशिवाय आरक्षण देणे अशक्य असताना भाजप केवळ स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी डीलिमिटेशनचा (मतदारसंघ पुनर्रचना) खेळ खेळत आहे,’ असा गंभीर आरोप थोरात यांनी केला.
थोरात यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर (Central and State Government) प्रश्नांची सरबत्ती केली. भाजपचा महिला आरक्षणाचा केवळ मुखवटा असून हेतू मात्र राजकीय आहे, असे स्पष्ट करत ते म्हणाले, १३१ व्या घटनादुरुस्तीचा फेटाळलेला प्रस्ताव हा लोकशाहीचा विजय आहे. महिला आरक्षणाला काँग्रेसचा कधीही विरोध नव्हता, उलट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीच महिला सबलीकरणाची पायाभरणी केली. भाजपने २०२३ मध्ये महिला आरक्षणाचे बिल मंजूर केले, तेव्हा अमित शाह यांनी जनगणनेनंतर अंमलबजावणीचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप जनगणना झालेली नाही. महिला आरक्षणाचा केवळ मुखवटा वापरून, मतदारसंघ पुनर्रचनेद्वारे हिंदी पट्ट्यात १३१ जागा वाढवून सत्ता काबीज करण्याचा भाजपचा ’प्लॅन’ आहे, अशी टीका त्यांनी केली. यामुळे दक्षिण भारतावर (South India) अन्याय होणार असून तिथे केवळ ४४ जागा वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
हे देखील वाचा : Balasaheb Thorat : विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत माजी मंत्री थोरातांचे सूचक वक्तव्य; म्हणाले, “मविआचे सर्वसंमतीचे उमेदवार….”
फडणवीसांचा ‘खोटा आत्मविश्वास’
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना थोरात म्हणाले की, भाजप नेते खोटा आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. वादविवाद करण्यासाठी कुणी तोडीसतोड असण्याची गरज नाही, आमची सामान्य महिलाही त्यांना उत्तर देण्यास सक्षम आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच पिंपरी-चिंचवडसारख्या शहरात जनता सरकारवर रोष व्यक्त करत असताना सत्ताधारीच रास्ता रोको करत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
नाशिकमधील टीसीएस प्रकरण
नाशिकबद्दल आत्मियता व्यक्त करताना थोरात म्हणाले, नाशिक हे माझे आवडते शहर आहे, पण अलीकडे येथे इतक्या एसआयटी का लागत आहेत, हा गंभीर प्रश्न आहे. टीसीएस प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे व्हावा आणि जो दोषी असेल त्याला कडक शिक्षा व्हावी.





