Saturday, September 5, 2026
HomeराजकीयEknath Shinde : एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली?

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली?

मुंबई । Mumbai

- Advertisement -

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय समीकरणांबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत नेमके काय विषय चर्चिले गेले, याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना दिली.

शिंदे यांनी सांगितले की, ही भेट पूर्णपणे सदिच्छा भेट होती. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्या गृहमंत्री म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले होते. “मोदीजींनी अमित शहा यांना गृहमंत्री म्हणून सर्वाधिक काळ उत्कृष्ट कामगिरी करणारे नेते असे संबोधले. त्यांनी शहा यांचे भविष्यातील योगदानही महत्त्वाचे ठरेल, असे म्हटले. या पार्श्वभूमीवर मी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ही भेट घेतली,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

शिंदे यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यातील दीर्घकालीन युतीवरही भाष्य केले. “एनडीएच्या स्थापनेपूर्वीपासून शिवसेना आणि भाजप एकत्र आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून आम्ही भाजपाच्या विचारधारेशी जोडले गेलो आहोत. गेल्या २५ वर्षांपासून आमची युती अखंड आहे आणि यापुढेही महायुती म्हणून आम्ही एकत्र लढू,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

या भेटीत शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे खासदारही उपस्थित होते. त्यांनी अमित शहा यांच्यासोबत एक सामूहिक बैठक आणि स्वतंत्र चर्चा केली. या बैठकीत महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा झाली. “महायुतीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही आम्ही विजय मिळवू, असा आम्हाला विश्वास आहे. ही बैठक अत्यंत सकारात्मक झाली आणि अमित शहा यांनीही याबाबत सकारात्मक दृष्टिकोन दर्शवला,” असे शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात शिंदे यांच्या या भेटीमुळे अनेक चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. महायुतीच्या एकजुटीवर शिंदे यांनी दिलेला भर आणि अमित शहा यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे आगामी निवडणुकांसाठी महायुती अधिक मजबूतपणे तयारी करत असल्याचे दिसते. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

शाळेतील शिपायाविरूध्द उपशिक्षिकेची फिर्याद; विनयभंग, धमकी व शिवीगाळ केल्याचा आरोप

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) शहरातील एका प्राथमिक शाळेतील महिला उपशिक्षिकेने शाळेच्या शिपायाविरूध्द विनयभंग, धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुरूवारी (३ सप्टेंबर) फिर्याद दाखल केली आहे....