मुंबई | Mumbai
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मंगळवारी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर बुधवारी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आज या निवडणुकीसाठी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, आणि प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषेचे ताळतंत्र सोडणाऱ्या आणि मतदारांना प्रलोभने देणाऱ्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, गुलाबराव पाटील, संजय शिरसाठ, जयकुमार गोरे, चित्रा वाघ यांना प्रलोभने देणारी वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. राज्यातील प्रचाराच्या रणधुमाळीत मतदारांना प्रलोभने देणाऱ्या २० नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. अशा वक्तव्याची आता निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, त्यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला आहे. त्यामुळे आता या नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्याकडून निधीला कात्री लावण्याचे वक्तव्य करण्यात आले होते. तुमच्याकडे मत तर माझ्याकडे निधी अशा आशयाचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. तर गुलाबराव पाटील यांनी लक्ष्मी दर्शन होणार अशा आशयाचे वक्तव्य केले होते. तर एकनाथ शिंदे यांनी तिजोरीच्या चाव्या संदर्भात विधान केले होते. तर खा कुणाचंही मटण पण दाबा कमळाचं बटण असे विधान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केल होते. त्यामुळे समोर आलेल्या माहितीनुसार वीस नेत्यांच्या नावाची यादी आता निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात आली आहे.
ज्या ज्या ठिकाणी नेत्यांच्या सभा असतात त्या त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कॅमेरे असतात. त्याच्या आधारे आता तपास केला जाणार आहे. असे २० नेते आहेत ज्यांच्या वक्तव्यांची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




