नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सरकारी कार्यालयात रुबाब दाखवून आणि आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti-Corruption Bureau) बडे अधिकारी असल्याचे भासवून दिशाभूल करणाऱ्या एका हायप्रोफाइल टोळीचा सातपूर पोलिसांनी (Satpur Police) पर्दाफाश केला आहे. सातपूर येथील उद्योग भवन परिसरातून बनावट ओळखपत्र आणि आलिशान गाडीवर ‘अँटी करप्शन ‘ची पाटी लावून फिरणाऱ्या दोन बहाद्दरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, (दि. १५) दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास सातपूर येथील आयटीआय सिग्नल (ITI Signal) जवळील उद्योग भवन परिसरात एक पांढऱ्या रंगाची आलिशान महिंद्रा स्कॉर्पिओ-एन गाडी (क्र. एमएच १५ जेएस ४८८६) संशयास्पदरित्या फिरत होती. या गाडीच्या समोरील काचेवर ‘ANTI CORRUPTION’ अशी पाटी लावलेली होती. या गाडीतील व्यक्ती शासकीय कार्यालयांमध्ये आणि परिसरात स्वतः लोकसेवक (अँटी करप्शनचे अधिकारी) असल्याचे भासवून लोकांची तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी (Police) गाडीची तपासणी केली असता, गाडीत मुख्य संशयित सचिन महादू ठोके (रा. अंतरिक्ष, वावरेनगर, अंबड, नाशिक) आणि त्याचा साथीदार रवींद्र द्विवेदी हे दोघे आढळून आले. संशयित सचिन ठोके याच्याकडे ‘अँटी करप्शन कमिटी’ (भ्रष्टाचार निर्मूलन समिती) नावाचे एक बनावट ओळखपत्र मिळून आले, त्याने स्वतःचे पद नाशिक शहर अध्यक्ष असल्याचे छापले होते.
कोणत्याही शासकीय विभागाचे लोकसेवक नसताना केवळ सर्वसामान्य जनता आणि शासकीय अधिकाऱ्यांवर वचक निर्माण करून खंडणी गोळा करणे किंवा फसवणूक करणे हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश आहिरे यांच्या आदेशाने हवालदार शेषराज नामदेव केदारे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सचिन ठोके आणि रवींद्र द्विवेदी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री आंबेकर करत आहेत.




