नवी दिल्ली | New Delhi
लोकसभा अध्यक्षपदाच्या (Loksabha Speaker) निवडणुकीत विरोधकांनी उमेदवार उतरवल्याने पुन्हा एकदा एनडीए विरुध्द इंडिया आघाडी (NDA vs India Alliance) अशी लढत पाहायला मिळणार आहे.लोकसभा अध्यक्षपदावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने माजी अध्यक्ष व खासदार ओम बिर्ला (Om Birla) तर विरोधकांकडून काँग्रेसचे खासदार के सुरेश यांचे नाव निश्चित करण्यात आले असून त्यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे.
हे देखील वाचा : निलेश लंकेंनी सुजय विखेंचे आव्हान स्वीकारले; इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
भाजपकडून (BJP) निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र, त्यालाही अपयश आले.त्यामुळे आता बुधवारी सकाळी ही निवडणूक होणार आहे. तसेच विरोधकांनी घातलेल्या एका अटीमुळे ही निवडणूक होत असल्याचे बोलले जात आहे. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विरोधकांनी घातलेल्या अटीची माहिती देतांना सांगितले की, लोकशाहीची एक प्रणाली असते. एनडीएतील सर्व घटकपक्षांशी चर्चेनंतर ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्षपदाच्या रुपाने सेवा करतील, असे ठरते. सकाळीही केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते खूप व्यस्त होते.
हे देखील वाचा : राज्यातील ‘हे’ ३० नवे चेहरे खासदार म्हणून पहिल्यांदाच संसदेत मांडणार मतदारसंघातील प्रश्न
त्यानंतर त्यांनी के.सी.वेणुगोपाल (KC Venugopal) यांच्याशी बोलण्यास सांगितले. यावेळी वेणुगोपाल आणि टी.आर.बालू यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांची जुनीच मानसिकता समोर आली. विरोधकांनी लोकसभा उपाध्यक्ष कोण असेल, हे आधी ठरवावे, नंतर अध्यक्षपदासाठी समर्थन दिले जाईल, अशी अट घातल्याची माहिती गोयल यांनी दिली.तसेच अशा प्रकारच्या राजकारणाची आम्ही निंदा करतो, अशी टीकाही गोयल यांनी केली.तसेच लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली असती तर लोकसभेची मर्यादा पाळली गेली असती.तसेही लोकसभा अध्यक्ष कोणत्याही एका पक्षाचे नसतात, ते संपूर्ण सभागृहाचे असतात. उपाध्यक्षही कोणत्याही पक्षाचे नसतात. त्यामुळे सभागृहाची सहमती आवश्यक असते. अशाप्रकारे उपाध्यक्ष एखाद्या ठराविक पक्षाचा असावा, हे लोकशाहीच्या कोणत्याही परंपरेत बसत नसल्याचे गोयल यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Sanjay Raut : “… तर लोक ‘त्यांना’ रस्त्यावर बांबूचे फटके मारतील”; राऊतांचा हल्लाबोल
दरम्यान, काँग्रेसचे केसी वेणुगोपाल म्हणाले की,”विरोधकांचा जर उपाध्यक्ष नसेल तर पाठिंबा देण्याऐवजी आम्ही आमचाच अध्यक्षपदासाठी उमेदवार उभा करू,असे म्हणत विरोधी पक्षाकडून के सुरेश (K Suresh) यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे आता बुधवारी अध्यक्षपदासाठी निवडणूक झाल्यावर कुणाची लोकसभेच्या सभापतीपदी वर्णी लागणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा