Friday, May 3, 2024
Homeधुळेधुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अश्विनी पाटील यांची निवड

धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अश्विनी पाटील यांची निवड

धुळे । Dhule। प्रतिनिधी

धुळे जिल्हा परिषदेवर (Dhule Zilla Parishad) बहुमत असलेल्या भाजपाने (BJP) पुन्हा सत्तेचा गढ (Again the bastion of power) राखला आहे. अध्यक्षपदी (President) अश्विनी पाटील (Ashwini Patil) यांची तर उपाध्यक्ष (Vice President) म्हणून देवेंद्र पाटील (Devendra Patil) यांची निवड (selection) झाली. त्यांना प्रत्येकी 38 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्ध्यांना केवळ 16 मतांवर समाधान मानावे लागले.

- Advertisement -

जिल्हा परिषदेचे एकूण 56 सदस्य आहेत. यात भाजपाकडे 36 सदस्य, शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस 6, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 7 तर अपक्ष 3 सदस्य आहेत. यापुर्वी सन 2020 मध्ये जि.प.च्या झालेल्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक सदस्य निवडून एकहाती सत्ता मिळविली. दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन त्यांच्या काही सदस्यांची संख्या कमी झाली. परंतु 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा काही जागा निवडून भाजपाने जिल्हा परिषदेत बहुमत सिध्द केले.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने आज नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. सकाळी 11 वाजेपासून निवड प्रक्रियेला सुरूवात झाली. पीठासीन अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कामकाज पाहिले.

भाजपातर्फे धुळे तालुक्यातील फागणे गटाच्या अश्विनी पाटील यांनी पिठासीन अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे नामनिर्देशपत्र दाखल केले. यावेळी भाजपाचे प्रा.अरविंद जाधव, जि.प. सभापती संग्राम पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर उपसभापती पदासाठी शिरपूर तालुक्यातील शिंगावे गटाचे देवेंद्र जयराम पाटील यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.

भाजपाचे बहुमत असतानाही महाविकास आघाडीने निवडणूक बिनविरोध होवू नये म्हणून आपले उमेदवार रिंगणात उतरविले. अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या धमाणे गटाच्या सुनिता शानाभाऊ सोनवणे यांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या बोरविहीर गटाच्या मोतनबाई पाटील यांनी अर्ज दाखल केला. यावेळी शानाभाऊ सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

माघारीचा निर्धारित वेळ संपल्यानंतर झालेल्या मतदान प्रक्रियेत अध्यक्षपदाच्या भाजपाच्या उमेदवार अश्विनी पाटील यांना 38 मते तर त्यांच्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी तथा शिवसेनेच्या सुनिता शानाभाऊ सोनवणे यांना 16 मते मिळालीत.

उपाध्यक्ष पदासाठी भाजपाचे देवेंद्र पाटील हे 38 मते मिळवून विजयी झालेत. तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या मोतनबाई पाटील यांना 16 मते मिळाली. तीन अपक्ष सदस्यांपैकी दोघांनी भाजपाच्या पारड्यात मते टाकल्याने त्यांना 36 ऐवजी 38 मते मिळालीत.

दोन सदस्य राहिलेत तटस्थ

धुळे तालुक्यातील बोरकुंड गटातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या शालिनी बाळासाहेब भदाणे आणि रतनपुरा गटातील सेनेच्या अनिता पाटील या दोन सदस्या आजच्या निवडणूक प्रक्रियेत तटस्थ राहिल्या. अर्थात त्यांनी मतदान केले असते तरीही भाजपाकडे बहुमत होते. तरीही सेनेच्या या दोन सदस्या तटस्थ का राहिल्यात, याबाबत मात्र चांगलीच चर्चा रंगली.

पक्षनेत्यांकडून सत्कार

जिल्हा परिषदेच्या नुतन अध्यक्षपदी भाजपच्या अश्विनी पाटील व उपाध्यक्षपदी देवेंद्र पाटील यांना संधी मिळाल्याने त्यांचा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, खा. डॉ.सुभाष भामरे, आ.अमरिशभाई पटेल, आ.जयकुमार रावल, महापौर प्रदीप कर्पे, मावळते जि.प.अधक्ष तुषार रंधे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, रामकृष्ण खलाणे, बाळासाहेब भदाणे, बबन चौधरी, प्रा.अरविंद जाधव, आशुतोष पाटील, भाऊसाहेब देसले, किशोर संघवी आदींनी सत्कार केला.

धुळे तालुक्याला प्रथमच बहुमान

जिल्हा परिषदेच्या महिला अध्यक्ष पदाचा बहुमान यंदा धुळे तालुक्याला प्रथमच मिळाला. यापुर्वी शिरपूर तालुक्याला दोनदा, शिरपूर व साक्री तालुक्याला प्रत्येकी एक वेळा महिलाध्यक्षपद मिळाले होते. परंतु, आता अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भाजपातर्फे प्रथमच धुळे तालुक्याला संधी देण्यात आली. अश्विनी पाटील यांच्या रूपाने धुळे तालुक्याला प्रथमच महिलाध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे.

भाजपाचे धक्कातंत्र

जि.प. अध्यक्ष पदासाठी लामकानी गटाच्या धरती देवरे यांच्यासह साक्री तालुक्यातून मंगला पाटील, शिंदखेडा तालुक्यातून कुसूम निकम तर शिरपूर तालुक्यातून अभिलाषा पाटील यांची नावे चर्चेत होती. त्यामुळे अध्यक्षपदासाठी चुरस वाढली होती. त्यातही सौ.देवरे या अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर काल भाजपा नेत्यांमध्ये रात्री उशीरापर्यंत खलबते झाली. परंतु, अध्यक्ष व उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल, याबाबत गोपनियता पाळण्यात आली. त्यामुळे उत्सुकता लागून होती. दुपारी अश्विनी पाटील यांनी अर्ज दाखल केल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

प्रवेश देण्यावरुन सेना व पोलिसांमध्ये शाब्दीक बाचाबाची

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या अनुशंगाने दुपारी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. दोन्ही बाजुचे प्रवेशद्वार बंद करुन आवश्यक त्यांनाच आत सोडण्यात आले. मात्र सदस्य नसतांनाही भाजपाचे काही पदाधिकारी मधे का? आम्हालाही सोडा असे सांगत शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे व पोलिसांमध्ये शाब्दीक वाद झालेत. पोलीस भाजपाच्या दबावाखाली वागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सदस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आ.अमरिशभाई पटेल, ना.गिरीष महाजन, आ.जयकुमार रावल यांनी मला न मागता, न बोलत उपाध्यक्ष पद दिले. या पदाद्वारे जि.प. सदस्यांना जास्तीत जास्त कसा न्याय दिला जाईल, असा प्रयत्न राहील. माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जावू देणार नाही.

देवेंद्र पाटील, उपाध्यक्ष, जि.प, धुळे

सर्वांगिण विकासावर भर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. गिरीष महाजन, आ.अमरिशभाई पटेल, खा.डॉ. सुभाष भामरे, आ.जयकुमार रावल यांच्या प्रेरणेने माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला अध्यक्षपदी विराजमान होता आले. या संधीचे मी सोने करेल. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी माझे सासरे प्रा. अरविंद जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहील. आरोग्य आणि शिक्षक या विषयावर विशेष लक्ष राहील.

अश्विनी भुषण पाटील, अध्यक्ष, जि.प.

- Advertisment -

ताज्या बातम्या