नाशिक l प्रतिनिधी Nashik
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांशी संबंधित न्यायालयीन अपील तसेच उमेदवारी अर्ज भरताना मुदतींचे पालन न झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने नाशिक जिल्ह्यातील तीन नगरपरिषदांच्या सात प्रभागांतील निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सिन्नर नगरपरिषदेचे चार, ओझर नगरपरिषदेचे दोन तसेच चांदवड नगरपरिषदेचा एक प्रभाग समाविष्ट आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नाशिक जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांचा स्थानिक सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार २ डिसेंबर रोजी मतदान व ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांचा प्रचार सोमवारी रात्री १० वाजता थांबणार आहे. जिल्हा प्रशासनाने ईव्हीएम तपासणीसह सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण केली आहे. मात्र, काही प्रभागांतील तांत्रिक व कायदेशीर अडचणींमुळे वेगळा निर्णय घेण्यात आला.
सिन्नर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २, ४, ५ व १०, ओझर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ व ८ आणि चांदवड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ येथील निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या आहेत. या प्रभागांसाठी स्वतंत्र व सुधारित निवडणूक कार्यक्रम ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी जाहीर करणार आहेत. त्या कार्यक्रमानुसार २० डिसेंबर रोजी मतदान, २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून, २३ डिसेंबरपूर्वी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
ओझरमधील प्रकरणामुळे निर्णय
ओझर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधून काँग्रेसचे उमेदवार दानिश पठाण यांनी नामनिर्देशन दाखल केले होते. मात्र, पाच सुचक नावे दिल्यामुळे त्यांचे नामनिर्देशन पत्र छाननीत अपात्र ठरवण्यात आले होते. तसेच प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवार गणेश बंदरे यांचे नामनिर्देशन पत्रही अर्जाचा भाग दोन कोरा ठेवल्याने अपात्र ठरले होते.
या दोन्ही निर्णयांविरोधात उमेदवारांनी न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने त्यांचे अर्ज वैध ठरवले; मात्र अपिलाचा निकाल २२ नोव्हेंबरनंतर लागल्याने महाराष्ट्र नगरपालिका नियम, १९६६ मधील नियम १७(१)(ब) नुसार माघारीसाठी उपलब्ध असलेला तीन दिवसांचा कालावधी व त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी होणारे चिन्हवाटप नियमानुसार पार पाडता येणे शक्य झाले नाही. याच कारणास्तव ओझरसह सिन्नर आणि चांदवड या तीन नगरपरिषदांच्या संबंधित सात प्रभागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
या निर्णयामुळे संबंधित प्रभागांतील उमेदवारांना फटका बसला असून त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
सुधारित निवडणूक कार्यक्रम
४ डिसेंबर : जिल्हाधिकारी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील
१० डिसेंबर (दुपारी ३ वाजेपर्यंत) : नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम मुदत
११ डिसेंबर : चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर
२० डिसेंबर : मतदान
२१ डिसेंबर : मतमोजणी
२३ डिसेंबरपूर्वी : संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण
प्रभावित प्रभाग व आरक्षण
सिन्नर नगरपरिषद
प्रभाग २ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
प्रभाग ४ अ : अनुसूचित जाती (महिला)
प्रभाग ५ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग १० ब : सर्वसाधारण
ओझर नगरपरिषद
प्रभाग १ अ : अनुसूचित जाती
प्रभाग ८ ब : सर्वसाधारण
चांदवड नगरपरिषद
प्रभाग ३ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग





