उक्कलगाव |वार्ताहर| Ukkalgaon
बेलापूर महावितरण उपकेंद्रांतर्गत दुरुस्तीचे काम करत असताना उच्च दाबाच्या विजेचा धक्का लागून कंत्राटी वायरमन गणेश बाळासाहेब थोरात (वय 28, रा. उक्कलगाव) यांचा मंगळवारी (दि. 30 जून) सकाळी सुमारे 10 वाजता दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मयत गणेश थोरात हे प्रथमेश इलेक्ट्रिकल्स, संगमनेर या कंत्राटी संस्थेमार्फत महावितरणच्या बेलापूर विभागात वायरमन म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे उक्कलगाव आणि एकलहरे या गावांतील वीजपुरवठा देखभालीची जबाबदारी होती. कर्तव्यदक्ष आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला होता.
गणेश थोरात यांच्या कुटुंबावर यापूर्वीही दुर्दैव कोसळले होते. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या भावाचे निधन झाले होते. आता गणेश यांच्या निधनामुळे कुटुंबाचा एकमेव कमावता आधार हरपला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, चुलते, दोन चुलत भाऊ तसेच वर्षभरापूर्वी विवाह झालेली पत्नी असा परिवार आहे. प्राथमिक माहितीनुसार, वरिष्ठ अधिकार्यांच्या सूचनेनुसार गणेश थोरात हे बेलापूर उपकेंद्रातून दुरुस्तीच्या कामासाठी संबंधित वीजवाहिनीवर गेले होते. काम सुरू करण्यापूर्वी त्यांनी संबंधित ऑपरेटरकडे कोणता फिडर सुरू आहे आणि कोणत्या फिडरवर काम करावयाचे आहे, याची माहिती घेतल्याचा दावा सहकार्यांनी केला आहे. त्यानंतर ते पोलवर चढून काम करत असताना अचानक विजेचा धक्का बसून खाली कोसळले.
वीजवाहिनीवर काम करण्यापूर्वी अधिकृत परमिट घेऊन संबंधित लाईन बंद असल्याची खात्री करणे आवश्यक असते. या प्रकरणात परमिट प्रक्रियेचे पालन झाले होते का, तसेच फिडर बंद करण्यासंदर्भातील नोंदींबाबत काही त्रुटी आहेत का, याबाबत ग्रामस्थांनी शंका उपस्थित केली आहे. घटनेनंतर संबंधित ऑपरेटर घटनास्थळावरून निघून गेल्याचा दावाही काही ग्रामस्थांनी केला असून, या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दुर्घटनेच्या वेळी घटनास्थळी महावितरणचा जबाबदार अधिकारी किंवा सहाय्यक कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. तसेच दुर्घटना घडल्यानंतर पंचनामा होण्यास विलंब झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
या घटनेनंतर उक्कलगाव परिसरात तीव्र संतापाची भावना असून, संबंधित अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी, मृताच्या कुटुंबाला योग्य आर्थिक मदत व शासकीय नियमांनुसार भरपाई द्यावी, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी महावितरण प्रशासनाकडून अधिकृत भूमिका समोर येणे अपेक्षित असून, चौकशी अहवालानंतर दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.




