Sunday, September 13, 2026
HomeराजकीयSanjay Raut : जरांगेंच्या भाषेचे समर्थन करत संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले...

Sanjay Raut : जरांगेंच्या भाषेचे समर्थन करत संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…

मुंबई । Mumbai

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्याऐवजी महायुती सरकार केवळ त्यांच्या गावरान भाषेवर मंथन करत असल्याचा घणाघाती आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राऊतांनी सरकारच्या या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

- Advertisement -

मनोज जरांगे पाटील यांची भाषा शिवराळ आहे, म्हणून त्यांच्या मागण्या मान्य करत नसल्याचे समर्थन सरकारमधील काही मंत्री करत आहेत. यावर भाष्य करताना संजय राऊत यांनी पुण्याचे विद्यानंद बापट यांचे ताजे उदाहरण सरकारसमोर ठेवले. “विद्यानंद बापट अत्यंत सभ्य, संस्कारी आणि आदर्श मराठी भाषेत आपले आंदोलन करत आहेत. मग सरकारने त्यांच्या मागण्या तरी कुठे मान्य केल्या?” असा थेट सवाल राऊतांनी विचारला.

उलट, सुसंस्कृत भाषा वापरल्याबद्दल बापट यांच्यावर सरकार पुरस्कृत गुंडांनी हल्ला चढवला, त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला. “बाळासाहेब ठाकरेंनी शिकवले आहे की सरकारला जी भाषा कळते, तीच भाषा वापरली पाहिजे. सरकारमध्ये अर्धे लोक गुंड आणि भ्रष्टाचारी भरले आहेत, त्यांना नेमकी कोणती भाषा कळणार?” असा खोचक टोलाही त्यांनी हाणला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरही राऊतांनी जोरदार निशाणा साधला. गणेशोत्सवाच्या काळात गृहमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस दलाचा अर्धा ताफा रस्त्यावर उतरवण्यात आला आहे. सुरक्षेच्या नावाखाली रस्ते बंद केल्याने सर्वसामान्य मुंबईकरांना आणि भाविकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा दावा राऊतांनी केला.

“गृहमंत्र्यांचे मुख्य कार्यक्षेत्र दिल्ली आहे. दिल्लीत वेळ जात नसेल, तर त्यांनी मणिपूर, आसाम किंवा पश्चिम बंगालमध्ये जायला हवे, जिथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. पण, मुंबईत त्यांना निधी देणारे बिल्डर आणि उद्योगपती भेटतात, म्हणून ते वारंवार इथे येतात,” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. अदानींच्या गणपती दर्शनावरूनही त्यांनी टोला लगावला. “तुम्ही एकटे या, तुमची सुरक्षेची गॅरंटी मुंबईकर घेतील. पण गृहमंत्र्यांच्या सततच्या दौऱ्यांमुळे मुंबईच्या प्रशासनावर आणि जनतेवर विनाकारण ताण पडत आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Accident News : प्रशासनाचा निष्काळजीपणा! पाण्याच्या पाईपवर आदळून तरुणाचा मृत्यू,...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik रस्त्यावर सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता सुरू असलेल्या कामामुळे एका तरुण पित्याचा बळी गेल्याची दुर्देवी घटना शहरातील कृषी...