अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर जिल्ह्यात 78 उद्योजकांनी सुमारे 13 हजार कोटी रुपयांची केलेली गुंतवणूक औद्योगिक क्षेत्राला नवा आत्मविश्वास देणारी आहे. औद्यगिक विकासाच्या दृष्टीने निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणामुळे उद्योजक जिल्ह्यात निर्भयपणे गुंतवणूक करून रोजगार निर्माण करतील, असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
शिर्डी, सुपा, घोडेगाव, अहिल्यानगर व श्रीरामपूर या औद्योगिक क्षेत्रात होत असलेल्या औद्योगिक गुंतवणुकीमुळे उद्योगासाठी नवा पर्याय उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी एमआयडीसीच्या जमिनीवर झालेले अतिक्रमण काढून, रोजगार उपलब्ध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच उद्योगास पोषक असलेले सुरक्षा आणि सुविधापूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्यामध्ये सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शासनाच्या उद्योग विभागाच्या वतीने गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात 78 उद्योगांशी उद्योग विभागाच्या माध्यमातून करार करण्यात आले. सुमारे 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक यामाध्यातून झाली आहे. सर्व उद्योजकांचा सन्मान ना. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या गुंतवणूक परिषदेस आ. काशिनाथ दाते, उद्योग विभागाच्या सहआयुक्त वृषाली सोने, उद्योजक अरविंद पारगावकर, औद्योगिक विकास मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी गणेश राठोड, जिल्हा उद्योग अधिकारी अशोक बेनके, जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. याप्रसंगी उद्योजकांशी संवाद साधतांना ना. विखे पाटील म्हणाले, अहिल्यानगर जिल्हा मुख्य औद्यगिक केंद्र म्हणून पुढे येत आहे. यापूर्वी औद्योगिक विकासात थोडे नकारात्मक वातावरण होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात येत असलेल्या गुंतवणूकीचा लाभ जिल्ह्याला होत असल्याने औद्योगिक क्षेत्रात सकारत्मक वातावरण निर्माण होत असल्याचे समाधान व्यक्त केले.
धाक दडपशाहीमुळे उद्योग माघारी गेल्याची खंत
जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी जागांची उपलब्धता करून दिल्यानंतर पहिला संरक्षण प्रकल्प निबे गृपच्या माध्यमातून जिल्ह्यात भविष्यात बेलवंडी, हरेगाव येथेही संरक्षण उत्पादनाचे प्रकल्प कार्वान्वित होणार असल्याचे सांगून, यापुर्वी असे प्रयत्न जिल्ह्यात झाले नाहीत. त्यामुळे औद्योगिक विकासात जिल्हा मागे राहिला. धाक दडपशाहीमुळे उद्योग माघारी गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.




