Friday, May 3, 2024
Homeनाशिकउपक्रमशिल शिक्षकाने उभारली ‘ज्ञानभिंत’

उपक्रमशिल शिक्षकाने उभारली ‘ज्ञानभिंत’

नाशिक | Nashik

नाशिक तालुक्यातील चांदगिरी येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशिल शिक्षक दत्तू कारवाळ यांनी संशोधक वृत्तीतून पहिली ते सातवीच्या अप्रगत विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रौढ साक्षरांसाठी ‘ज्ञानभिंत’ या शैक्षणिक उपक्रमाची शाळेतील रिकाम्या भिंतींचा अभिनव वापर करुन निर्मिती केली आहे.

- Advertisement -

त्यासाठी शाळेतील वर्गाच्या मुख्य फळ्याच्या खालील व वरील भागातील रिकाम्या जागेचा शैक्षणिक नवनिर्मितीकामी सुंदर उपयोग करुन घेण्यात आल्यामुळे वर्गातच शैक्षणिक वातावरणाची निर्मिती होऊन विद्यार्थी खेळात रमावेत तसे वर्गात अभ्यासात रमतात. या उपक्रमाचे लोकार्पण नुकतेच चांदगिरी येथे करण्यात आले.

‘ज्ञानभिंत’ उपक्रमात भिन्न स्वरुपाच्या शैक्षणिक साधनांचा समावेश होतो. त्यामध्ये गणित संबोधपट्टी अंतर्गत इलेक्ट्रॉनिक पट्टी व पट्टा फळा अंतर्गत द्रुष्टीकरण, द्रुढीकरण व संबोधन पट्टा फळा यांचा उल्लेख करता येतो. ही शैक्षणिक साधने शाळेतील वर्गाच्या भिंतीवरच साकारलेले असल्याने चांदगिरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींनीच आता विद्यार्थ्यांना शिकवण्याचा वसा घेतला आहे. म्हणुनच शालेय विद्यार्थ्यांसह प्रौढ साक्षरांनाही ज्ञानदान करणाऱ्या या उपक्रमास ‘ज्ञानभिंत शैक्षणिक नवसंशोधन उपक्रम’ अशी उपमा दिली आहे.

इयत्ता पहिली, दुसरी हे शालेय जिवनाचा पायाच असतात. अशावेळी मुलांची अभ्यासाची आवड टिकून राहावी, मुलांनी मोबाईल, टि.व्ही.च्या अती आहारी जाण्यापासून मुक्त व्हावे, शिकविलेला अभ्यास त्यांच्या स्मरणपटलावर कोरला जावा या तळमळीपोटी ‘ज्ञानभिंत’ या उपक्रमाची निर्मिती करण्यात आल्याचे कारवाळ यांनी सांगितले आहे.

या उपक्रमशिल शिक्षकांना ज्ञानभिंतीच्या निर्मितीकामी डायट नाशिकचे ज्येष्ठ अधिव्याख्याता योगेश सोनवणे, तालुका गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब ठाकरे, भाऊसाहेब जगताप, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश वैष्णव, केंद्र प्रमुख वाल्मिक हिंगे, विषय तज्ज्ञ यशवंत रायसिंग, शिक्षिका इंदिरा नागरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.

स्थानिक पातळीवर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश हांडगे, उपाध्यक्ष जयराम वांजूळ व सर्व सदस्य सरपंच शोभा कटाळे, सदस्य किरण कटाळे व सर्व सदस्य ग्रामपंचायत चांदगिरी यांचे तसेच चांदगिरीचे सामाजिक कार्यकर्ते रमेश कटाळे, संतोष कटाळे, नंदू कटाळे, विजय बागूल, सोमनाथ बागूल, शालेय मदतनीस कमल कटाळे सर्व ग्रामस्थ चांदगिरी व पालकांचेही सहकार्य लाभले आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे माजी राज्याध्यक्ष काळुजी बोरसे पाटील, कोषाध्यक्ष केदुजी देशमाने, राज्य संघटक सुनिल भामरे, जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनवणे यांनी भेट देऊन, पाहणी करुन या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमाचे लोकार्पण नाशिक पंचायत समिती सदस्या उज्वला जाधव यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या