मुंबई । वृत्तसंस्था Mumbai
महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळा’ची स्थापना केली आहे. या महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल. महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारीची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद शासनाने केली आहे. मंत्रिमंडळाच्या 11 जुलैच्या बैठकीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. आज राज्य सरकारने त्याबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
आषाढी वारी म्हणजे आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातील वारकरी भक्तांनी विविध गावांपासून पंढरपूरपर्यंत केलेली सामुदायिक पदयात्रा होय. वारीनिमित्त लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे जमतातच. शिवाय पंथाची दीक्षा न घेतलेले अनेक विठ्ठलभक्तही येतात. आंध्र-कर्नाटक राज्यांतून येणार्यांची संख्या मोठी असते. वारी ही आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुध्द एकादशी अशा दोन वेळा होते.
त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तिनाथांची, शेगावहून संत गजानन महाराज यांची पालखी दरवर्षी निघते. तसेच संत तुकाराम महाराज (देहू), संत एकनाथ (पैठण), संत सोपानकाका (सासवड), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत नामदेव (पंढरपूर), संत नरहरी सोनार (पंढरपूर), संत जनार्दनस्वामी (छत्रपती संभाजीनगर), संत जयरामस्वामी (वडगाव), संत शेकूबोवा (शिरसावडी), संत घाडगेबोवा (कोळे), संत तपकिरीबोवा (चिंचगाव), संत मच्छिंद्रनाथ (मच्छिंद्रगड), संत रोहिदास (पंढरपूर), संत संताबाई (पंढरपूर), संत चोखोबा (पंढरपूर), संत चोखोबा बंका (मेहुणपुरा), संत दामाजी (मंगळवेढे), संत रुक्माबाई (कौंडण्यपूर- अमरावती), संत शंकर महाराज (माहुली-अमरावती), संत गोरखनाथ (शिराळा) आदी संतांच्या पालख्या वेगवेगळ्या ठिकाणाहून मार्गस्थ होतात. या दिंड्यांसोबत लाखो भाविक पंढरीच्या मार्गावर असतात.
महाराष्ट्रातील कीर्तनकार व वारकर्यांना सोयी-सुविधा पुरविण्याकरता व कल्याणकारी योजना राबवण्याकरता ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ स्थापन करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.
महामंडळाची रचना
मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूरला असेल.
महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकार्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल.मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे भागभांडवल रू.50 कोटी इतके असेल.
प्रस्तावित महामंडळाचे कार्य
शेकडो वर्षांपासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकर्यांची पायी दिंडीतून वारी करण्याची पवित्र परंपरा महाराष्ट्रात आहे. सर्व तिर्थक्षेत्रांचा विकास, किर्तनकार व वारकर्यांना अन्न, निवारा, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमा कवच, पायाभूत सुविधा इ. सोयी-सुविधा पुरविण्याकरता व कल्याणकारी योजना राबवण्याकरता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या महामंडळामार्फत वारकरी, कीर्तनकार, तीर्थक्षेत्रांसाठी सोयी-सुविधा पुरवण्याबाबत कार्य करण्यात येईल.