अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन संदर्भात आक्षेप नोंदवलेले पाच पराभूत उमेदवार व लोकसभेतील पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रतिनिधींना मंगळवार (दि.21) रोजी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मॉकपोल (ईव्हीएम मशीनची मेमरी तपासणी) प्रक्रिया समजावून सांगितली. दरम्यान, ही पडताळणी म्हणजे मतमोजणीची फेरतपासणी असा अर्थसमजाणार्यांची यावेळी भ्रमनिरास झाला.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी 40 ईव्हीएम मशीन संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तर विधानसभा निवडणुकीतील दहा उमेदवारांनी पडताळणीसाठी अर्ज केला होता. यातील पाच उमेदवारांनी माघार घेतली असून पाचजणांचे पडताळणीसाठी अर्ज आहेत. यापैकी डॉ. विखे पाटील यांच्या प्रतिनिधीसह, राम शिंदे, अॅड. प्रताप ढाकणे, राणी लंके, राहुल जगताप आणि शंकरराव गडाख यांच्या प्रतिनिधी मंगळवारी मॉकपोल प्रक्रिया समजावून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.
निवडणुकीची मतमोजणी झाल्यापासून सात दिवसांत दुसर्या किंवा तिसर्या क्रमांकावरील उमेदवारांना पाच टक्के ईव्हीएम मशीन पडताळणीसाठी अर्ज करता येतो. एका मशीनसाठी 47 हजार 200 रुपये शुल्क भरावे लागते. कोणत्या उमेदवाराने निकालाला न्यायालयात आव्हान दिलेले नसेल, तर निकालाच्या 45 दिवसांनी ईव्हीएमची पडताळणी केली जाते. परंतु 9 उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेत, निवडणूक याचिका सादर केल्या आहेत.
मंगळवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मॉकपोल (ईव्हीएम मशीनची मेमरी तपासणी) ची प्रक्रिया अर्ज केलेल्या निवडणुकीतील पराभूत उमेदवारांच्या प्रतिनिधींना समजावून सांगण्यात आली. मात्र, नेमकी कशाची तपासणी होणार आधी लक्षात न आलेल्या आणि प्रक्रिया समाजवून सांगितल्यानंतर अनेकांचा भ्रमनिराश झाल्याचे चित्र मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसारात दिसून आले.
नऊ जणांची कोर्टात धाव
डॉ. सुजय विखे पाटील, प्रा. राम शिंदे, बाळासाहेब थोरात, अभिषेक कळमकर, अॅड. प्रतापराव ढाकणे, प्राजक्त तनपुरे, अमित भांगरे, राणी लंके, संदीप वरपे या नऊजणांनी निवडणूक निकालाविरोधात कोर्टात धाव घेतलेली आहे.
कोर्टाच्या निकालानंतर त्यांचे मॉककोल
निवडणूक आयोगाकडे अर्ज केलेल्या उमेदवरांपैकी डॉ. सुजय विखे पाटील, प्रा. राम शिंदे, प्रताप ढाकणे, राणी लंके यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या चार उमेदवारांनी आक्षेप घेतलेल्या मशीनची पडताळणी न्यायालयाच्या आदेशानंतरच होणार आहे. तर राहुल जगताप आणि शंकरराव गडाख या उमेदवारांचे ईव्हीएम पडताळणीचे अर्ज कायम राहिले तर निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या तारखेला ईव्हीएम मशीनचे मॉकपोल होणार आहे.