श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दाखल होत कारवाई केली, शहराच्या विविध भागांतील सात ते आठ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानशी संबंधित रिल्स पहाणे व त्यावर आक्षेपार्ह स्वरुपाच्या प्रतिक्रीया केल्याच्या संशयावरून शहरातील चार जणांची सखोल चौकशी करुन त्यांना नोटीसाही बजविल्याचे समजते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानातील कथित गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित काही व्यक्तींशी श्रीरामपूरमधील काही तरुणांचा संपर्क असल्याची माहिती तपास यंत्रणांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसने शहरातील विविध ठिकाणी नियोजनबद्ध छापेमारी करत संशयित व्यक्तींची चौकशी सुरू केली. तपास यंत्रणांच्या प्राथमिक अंदाजानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपर्क प्रस्थापित करून काही महत्त्वाच्या व्यक्तींबाबत माहिती संकलित करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तसेच काही ठिकाणांची रेकी करण्यात आल्याचा संशयही तपासाच्या केंद्रस्थानी आहे. या अनुषंगाने जप्त करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्यांचे बारकाईने विश्लेषण करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान संशयितांकडून मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच सोशल मीडिया व्यवहारांशी संबंधित माहिती जप्त करण्यात आली आहे. या तपासातून आणखी महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संपूर्ण प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरील हालचालींवर सुरक्षा यंत्रणांचे बारकाईने लक्ष असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.




