Thursday, July 23, 2026
HomeनगरAhilyanagar : राहुरी, नेवाशातील भेसळखोरांना दणका

Ahilyanagar : राहुरी, नेवाशातील भेसळखोरांना दणका

अन्न विभागाकडून 2.84 लाखांचा संशयित माल जप्त || आईस्क्रीम व खाद्यतेलाचे नमुने तपासणीसाठी पाठविले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार तुकाराम मुंडे यांनी स्वीकारताच अहिल्यानगर जिल्ह्यात अन्न भेसळविरोधी मोहिमेला वेग आला असून येथील अन्न व औषध प्रशासनाने राहुरी आणि नेवासा तालुक्यात धडक कारवाई करत दोन लाख 84 हजार 180 रूपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला आहे. या कारवाईत आईस्क्रीम व खाद्यतेलाचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्यात आले असून संबंधित मालाचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी (2 जून) राहुरी येथील शिवशक्ती आईस्क्रीम या आस्थापनाची तपासणी केली. यावेळी शिवशक्ती ब्रँडच्या ‘गुलकंद’ आणि ‘अमेरिकन नट्स’ या आईस्क्रीम प्रकारांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने 41 हजार 440 रूपये किमतीची 148 पॅकेट्स आईस्क्रीम जप्त करण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान, नेवासा तालुक्यातील कडू गल्ली परिसरातील संतोष किराणा स्टोअर्स येथेही तपासणी मोहीम राबविण्यात आली. या ठिकाणी एसबीजी ब्रँडच्या रिफाइंड पामोलीन ऑईलचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. खाद्यतेलाचा साठा संशयास्पद आढळून आल्याने दोन लाख 42 हजार 740 रूपये किमतीचे 1 हजार 498.4 किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार आणि सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच नियम 2011 अंतर्गत जिल्हाभर विविध आस्थापनांची तपासणी करण्यात येत आहे.

या कारवाईत सहायक आयुक्त (अन्न) अ. अ. भोईटे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार आणि उज्ज्वला पाटील यांनी सहभाग घेतला. जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बाजारात उपलब्ध अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही शंका असल्यास त्वरित अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे सहायक आयुक्त (अन्न) भोईटे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

पडसाद : रक्तपेढीला मिळाले अखेर उद्घाटनाचे टॉनिक!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक भारतीय प्रतिभूती मुद्रणालय म्हणजेच इंडिया सियुरिटी प्रेसने आपल्या सीएसआर फंडातून दिलेल्या तीन कोटी बासष्ट लाख रुपये...