अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधानसभा निवडणुकीतील ‘ईव्हीएम’ मशिन पडताळणी करण्यातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी जिल्हा निवडणूक शाखेला अर्ज देत माघार घेतली आहे. यापूर्वी प्राजक्त तनपुरे यांनीही अर्ज मागे घेतला होता. आतापर्यंत तीन उमेदवारांची ईव्हीएम पडताळणीतून माघार घेतली आहे. विधानसभा मतदारसंघातील दुसर्या व तिसर्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवारांना मतदानाविषयी शंका असल्यास सात दिवसांत ईव्हीएम, व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करतो येतो. 30 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातून 10 उमेदवारांनी 74 ईव्हीएम मशीनबाबत जिल्हा निवडणूक शाखेकडे तक्रार केली होती.
यामध्ये माजी मंत्री थोरात यांचा 14 मशीनबाबत आक्षेप होता, तर 3 मशीनबाबत कळमकर यांची तक्रार होती. एका मशिनच्या पडताळणीसाठी जीएसटी करासह 47 हजार 200 रूपये शुल्क ठेवले आहे. माजी मंत्री थोरात यांनी 14 मतदार केंद्रांवरील ईव्हीएम पडताळणीसाठी 6 लाख 60 हजार 800 रूपये शुल्क भरले होते. कळमकर यांनी तीन मतदान केंद्रातील मशिनच्या पडताळणीसाठी 1 लाख 41 हजार 600 रूपये शुल्क भरले होते. मागील आठवड्यात प्राजक्त तनपुरे यांनी पाच ईव्हीएमबाबत असलेली तक्रार मागे घेतली होती. त्यांनी 2 लाख 36 हजार रूपये भरले होते.
या तिन्ही उमेदवारांना भरलेले शुल्क परत दिले जाणार आहे. दरम्यान, शिर्डीतून प्रभावती घोगरे यांचे 2, कर्जत-जामखेडमधून राम शिंदे यांचे 17, नेवाशातून शंकरराव गडाख यांचे 10, पारनेरमधून राणी लंके यांचे 5, कोपरगावातून संदीप वर्पे यांचे 1, पाथर्डी-शेवगावमधून प्रताप ढाकणे यांचे 2, व श्रीगोंद्यातून राहुल जगताप यांचे 2 अशा सात उमेदवारांचे अर्ज बाकी आहेत.
13 जानेवारीला प्रशिक्षण
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक शाखेच्या अधिकार्यांसाठी ईव्हीएम पडताळणीसाठी पुणे येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय विकास प्रबोधनी (यशदा) मध्ये 13 जानेवारीला प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षण शिबिरात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ सहभाग घेणार आहेत. या प्रशिक्षणानंतर ईव्हीएम पडताळणी होणार आहे.