दिल्ली । Delhi
देशाचे माजी पंतप्रधान आणि भारताचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (ता. 26 डिसेंबर) रात्री निधन झाले. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सायंकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज (२७ डिसेंबर) रोजी आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ११ वाजता यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कर्नाटक, तेलंगणसारख्या राज्यांनी आज म्हणजेच २७ डिसेंबर रोजी शासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.
देशातील एखाद्या प्रमुख संवैधानिक पदांवर काम करत असलेल्या किंवा यापूर्वी काम केलेल्या व्यक्तींच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जातो. राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्यानंतर सर्वच शासकीय इमारतींबरोबरच जिथे जिथे सार्वजनिक ठिकाणी असलेले राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवले जातात. राष्ट्रीय दुखवट्याच्या कालावधीत संसदेबरोबरच सर्व सचिवालये, सर्व राज्यांमधील विधानसभा आणि महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जातो. या शिवाय देशाच्या बाहेरील भारतीय दूतावासावरील राष्ट्रध्वजही अर्ध्यावर उतरवला जातो.
निधन झालेल्या व्यक्तीचे सामाजिक, राजकीय किंवा ती ज्या क्षेत्रात कार्यरत असेल त्या क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदानाचा विचार करुनच सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करायचा की नाही हे ठरवलं जातं. मात्र राष्ट्रीय दुखवटा कधी जाहीर करावा याबद्दल कोणतेही ठोस आणि कठोर नियम नाही. हा निर्णय त्या त्यावेळी घेतला जातो. राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, समाजिक क्षेत्र, क्रिडा, मनोरंजन याशिवाय प्रशासकीय क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या देशातील नामवंत व्यक्तींना राजकीय सन्मान देण्याच्या उद्देशाने त्यांच्या निधानानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जातो.