मुंबई । Mumbai
राज्यातील बदलत्या हवामानाने पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे आता अवकाळी पावसाचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे शनिवारी राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि गारपिटीचाही अंदाज असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागांत ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांनाही ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर घाट विभाग, सांगली आणि सोलापूर, तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा प्रभाव जाणवू शकतो. विदर्भातील वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्याच्या अनेक भागांत पावसाचा प्रभाव वाढत असताना कोकण किनारपट्टीवर मात्र उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण कोकणात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असली, तरी बहुतांश भागात उन्हाचा कडाका जाणवणार आहे. हवामान विभागाने रविवारपर्यंत कोकणातील ही स्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
अवकाळी पावसामुळे राज्यातील कमाल तापमानात सध्या काही प्रमाणात घट झाली असून नागरिकांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र, हा दिलासा अल्पकालीन ठरण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत राज्यातील तापमानात पुन्हा २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले असून वादळी वाऱ्यांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे.





