नाशिक | १० सप्टेंबर २०२६:जिमाका वृत्तसेवा
सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७च्या नियोजनात तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा प्रभावी वापर करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण आणि आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या *‘कुंभ इनोव्हेशन चॅलेंज २०२६’*साठी अर्ज करण्याची मुदत आता ३० सप्टेंबर २०२६पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे स्टार्टअप्स, तंत्रज्ञान कंपन्या, संशोधक आणि नवोन्मेषकांना आपल्या तंत्रज्ञानाधारित उपाययोजना सादर करण्यासाठी आणखी संधी उपलब्ध झाली आहे.
१२ कोटींहून अधिक भाविकांच्या संभाव्य सहभागाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष वापरता येतील अशा तंत्रज्ञानाधारित उपायांचा शोध या आव्हानातून घेतला जात आहे. भाविकांना कुंभनगरीत दाखल झाल्यापासून मार्गदर्शन मिळणे, स्वच्छता व्यवस्थापन, आपत्कालीन प्रतिसाद, गोदावरीचे संरक्षण, कुंभाचा डिजिटल वारसा आणि चुकीच्या माहितीला आळा घालणे या क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण उपायांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.
या आव्हानासाठी ‘First Hour@Kumbh’, ‘Swachh Kumbh 360°’, ‘Kumbh SOS Grid’, ‘Godavari Guardian’, ‘Kumbh Memories’ आणि ‘TruthShield Kumbh’ असे सहा विषय निश्चित करण्यात आले आहेत. निवडलेल्या नवोन्मेषकांना त्यांच्या उपाययोजनांचे तज्ज्ञ आणि परीक्षकांसमोर प्रत्यक्ष सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.
“सिंहस्थ महाकुंभ मेळ्याचा मोठा आवाका लक्षात घेता, प्रत्यक्ष क्षेत्रात उपयोगी ठरणाऱ्या तंत्रज्ञानाधारित उपायांची गरज आहे. विविध क्षेत्रांतील नवोन्मेषकांनी या संधीचा लाभ घेऊन कुंभ व्यवस्थापनातील आव्हानांवर व्यवहार्य आणि मोठ्या प्रमाणावर राबविता येतील असे उपाय सादर करावेत,” असे कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
AI, अध्यात्म आणि तंत्रज्ञानावरही मंथन
कुंभ इनोव्हेशन चॅलेंजसोबतच होणाऱ्या ‘टेक मंथना’त कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञानाची नैतिकता, श्रद्धा, अध्यात्म आणि मानवी मूल्ये यांवरही चर्चा होणार आहे. ‘AI आणि श्रद्धा’, ‘कुंभाचा डिजिटल वारसा’, ‘डीपफेकच्या युगातील सत्य आणि विश्वास’ तसेच ‘Sovereign AI आणि Data Sovereignty’ यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांचे विचारमंथन होणार आहे.
कोण सहभागी होऊ शकते?
निधी प्राप्त स्टार्टअप्स व स्केल-अप्स, तंत्रज्ञान कंपन्या, सिस्टीम इंटिग्रेटर्स, इन्फ्रास्ट्रक्चर-टेक कंपन्या, GovTech क्षेत्रातील नवोन्मेषक, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, वैज्ञानिक आणि स्वतंत्र तज्ज्ञ या आव्हानात सहभागी होऊ शकतात. सहभागींकडे कार्यरत उत्पादन, प्रोटोटाइप किंवा संकल्पनेच्या विकासाची ठोस प्रगती असणे अपेक्षित आहे.
अर्जाची अंतिम मुदत : ३० सप्टेंबर २०२६




