नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिंहस्थ ध्वजारोहण, राष्ट्रपतींचा नाशिक दौरा आणि गोदाआरती यासारखे व्हीव्हीआयपी कार्यक्रम पार पडताच रविवारी (दि. १) नाशिकच्या रस्ते अन् बाजारपेठांमध्ये खरेदीदारांची अभूतपूर्व गर्दी लोटली. गेल्या दोन दिवसांपासून अघोषित बंदसदृश परिस्थितीनंतर अचानक रस्त्यावर उतरलेल्या नाशिककरांच्या गर्दीने संपूर्ण मध्यवर्ती नाशिक शहरात (Nashik City) वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांचे नियोजन नसल्याने रविवार कारंजा, मेनरोड आणि शालिमार परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला.
गाड्यांच्या रांगा, हॉर्नचा कर्णकर्कश गोंगाट आणि ठप्प झालेली वाहतूक दोन दिवसांच्या साचलेल्या गर्दीने रविवारी एकाच वेळी रस्ते व्यापल्यामुळे वाहतुकीची समस्या अत्यंत बिकट झाली होती. महापालिकेच्या सिटीलिंक बसला रविवार कारंजा ते एमजी रोड हे अवघ्या काही मिनिटांचे अंतर कापण्यासाठी तब्बल २० ते २५ मिनिटांचा कालावधी लागला. मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, मेनरोड आणि एमजी रोडवर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. विशेषतः एमजी रोडकडून वंदे मातरम् चौक ते दहीपुलाकडे जाणारा मार्ग ग्राहक, व्यावसायिक आणि वाहनांच्या गर्दीमुळे जाम झाला होता. गर्दीचा ताण वाढल्याने एमजी रोडवरील वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू होती. सर्वत्र वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाने नागरिक (Citizen) हैराण झाले होते.
३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या नाशिक दौऱ्याच्या व्हीव्हीआयपी सुरक्षेचा भाग म्हणून पाेलीस प्रशासनाने मुख्य बाजारपेठांसह अनेक महत्त्वाचे रस्ते व उपरस्ते बंद ठेवले होते. महापालिकेनेही मेनरोड व गोदाघाटावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली होती. ३१ ऑक्टोबरला राष्ट्रपतींचा दौरा आणि गोदाआरती शांततेत पार पडल्यानंतर, रविवारी(दि. ०१) सुट्टीचा दिवस साधत हजारो नाशिककर दुचाकी, चारचाकी वाहनांसह कुटुंबाला घेऊन खरेदीसाठी बाहेर पडले. येत्या तीन दिवसांवर दिपाेत्यव सुरु हाेणार असल्याने आणि नोकरदार तसेच कंपनी कामगारांचे सानुग्रह अनुदान (बोनस) जमा झाल्याने बाजारपेठेत नवचैतन्य पसरले आहे. कपडे, फराळाचे साहित्य आणि दिवाळीच्या (Diwali) सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी रविवार कारंजा, मेनरोड आणि शालिमारच्या रस्त्यांवर नागरिकांनी अक्षरशः ताबा मिळवला होता.
अतिरिक्त अंमलदारांची मागणी
गर्दीचा अंदाज असूनही शहर वाहतूक पोलिसांचे एकूण नियमन रविवारी बिघडले होते. अनेक मुख्य चौकांत अंमलदार गैरहजर होते, तर काही ठिकाणी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कोंडी सोडवणे अशक्य झाले. येत्या आठवड्यात दिवाळी साजरी होत असल्याने बाजारपेठेतील ही गर्दी आणि वाहतूक कोंडी अधिक जटिल स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने तातडीने रविवार कारंजा, शालिमार, मालेगाव स्टँड, एमजी रोड आणि वकील वाडी या भागांत अतिरिक्त वाहतूक अंमलदार तैनात करावेत, अशी अपेक्षा वाहनधारक आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे.
मुद्दे
एमजी राेड वारंवार जाम
व्हीआयपी दौऱ्यानंतर तुफान गर्दी
मुख्य रस्ते, बाजारपेठा जाम
सिटीलिंक बसेस अडकल्याने खोळंबा
बोनसमुळे खरेदीला उधाण
वाहतूक पोलिसांचे ढिसाळ नियोजन
अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची मागणी



