
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्यात सुरु असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला (एसआयआर) १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ४ ऑगस्टपर्यंत राज्यात सरासरी ७५ टक्के एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंबई, ठाणेसारख्या भागात डिजिटायझेशनचे प्रमाण ५० टक्केंच्या आसपास आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत भारत निवडणूक आयोगाकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती. आयोगाने ही विनंती मान्य केली आहे.
आता सुधारित वेळापत्रकानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडून गृहभेटींचा कालावधी ३० जून ते १७ ऑगस्ट असा राहणार आहे. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि पुनर्रचनेचे कामही १७ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मतदार याद्यांचा प्रारूप मसुदा २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार असून, त्यावरील सुनावणी तसेच निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण केली जाईल. अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.




