मुंबई | प्रतिनिधी Mumbai
देशात सध्या जनगणनेचे काम सुरु असल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या २०२६ या वर्षातील सर्वसाधारण बदल्यांना एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार राज्य सरकारला आता ३० जून २०२६ पर्यंत बदली प्रक्रिया राबविता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या मसुद्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात करण्यात येतात. मात्र देशात जनगणना २०२७ अंतर्गत पहिला टप्पा सुरु आहे. त्यामध्ये घरयादी तयार करणे आणि घरगणना हे काम १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येऊ नयेत, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ द्यावी लागणार आहे.
या निर्णयानुसार बदली संदर्भातील अधिनियमात मुदतवाढीबाबत सुधारणा करावी लागणार आहे. त्यासाठी मुदतवाढीबाबतचा अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने जाहीर करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. सध्या बदल्यांचा हंगाम सुरु असल्याने सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची सोयीच्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी धडपड सुरु आहे. त्यासाठी मंत्रालयात बदलीपात्र अधिकारी -कर्मचाऱ्यांची गर्दी वाढली आहे. मात्र, सर्वसाधारण बदल्याना मुदतवाढ देण्यात आल्याने आता कर्मचाऱ्यांना बदलीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.




